वाढीव मतदानाची माहिती देण्यास टाळाटाळ; सर्व पक्षांना एकत्र येण्याचे ‘वंचित’चे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:31 IST2024-12-14T08:31:08+5:302024-12-14T08:31:29+5:30
राज्यातील सर्वच मतदारसंघांत सायंकाळी ६ वाजेनंतर किती मतदान झाले, मतदारांना किती स्लिप वाटल्या त्याची बूथनिहाय संख्या मिळावी तसेच स्लिप देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आणि जर चित्रीकरण केले असेल तर त्याबाबत माहिती मिळावी, अशी विनंती वंचितकडून करण्यात आली होती.

वाढीव मतदानाची माहिती देण्यास टाळाटाळ; सर्व पक्षांना एकत्र येण्याचे ‘वंचित’चे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभा निवडणुकीत सायंकाळी ६ वाजेनंतर झालेले मतदान नेमके किती आहे, किती मतदारांना टोकन वाटले गेले होते, याची माहिती देण्यास निवडणूक अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे निश्चितच मतदानामध्ये घोळ आहे, असा आरोप करीत या सदोष यंत्रणेविरोधात आता सर्वच पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
राज्यातील सर्वच मतदारसंघांत सायंकाळी ६ वाजेनंतर किती मतदान झाले, मतदारांना किती स्लिप वाटल्या त्याची बूथनिहाय संख्या मिळावी तसेच स्लिप देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आणि जर चित्रीकरण केले असेल तर त्याबाबत माहिती मिळावी, अशी विनंती वंचितकडून करण्यात आली होती. यापैकी नांदेड दक्षिण, भूम-परांडा आणि औरंगाबाद पश्चिम येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्राला उत्तर दिले आहे. या उत्तरानुसार संबंधित मतदान केंद्रांचे मतदान केंद्राध्यक्ष यांच्या दैनंदिनीमध्ये ही माहिती नमूद असून, ही दैनंदिनी लिफाफ्यामध्ये सीलबंद करून सुरक्षा कक्षात जमा केलेली आहे. त्यामुळे ही माहिती उपलब्ध करून देता येणार नाही, असे कळवल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
प्रतिसाद नाही
आगामी निवडणुका जर पारदर्शक व्हायच्या असतील तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन याविरोधात लढा दिला पाहिजे. काँग्रेसने या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी त्यांना विनंती केली आहे. मात्र, त्यास अद्याप प्रतिसाद आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.