पुढील काही दिवस उष्ण झळांपासून मुक्ती; मुंबई ३३ अंश सेल्सिअस; राज्यभरातही पारा घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:50 IST2026-04-09T13:45:17+5:302026-04-09T13:50:36+5:30

मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलच्या उन्हाळ्याची सुरुवात मुंबईकरांना दिलासा देणारी

Relief from heatwaves for the next few days Mumbai 33 degrees Celsius Mercury drops across the state | पुढील काही दिवस उष्ण झळांपासून मुक्ती; मुंबई ३३ अंश सेल्सिअस; राज्यभरातही पारा घटला

पुढील काही दिवस उष्ण झळांपासून मुक्ती; मुंबई ३३ अंश सेल्सिअस; राज्यभरातही पारा घटला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलच्या उन्हाळ्याची सुरुवात मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. कारण एप्रिलच्या सुरुवातीपासून मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. परिणामी मुंबईकरांना बसणाऱ्या उन्हाच्या झळा मार्चच्या तुलनेत कमी असून, पुढील काही दिवस मुंबईला उन्हाच्या तीव्र झळांपासून मुक्ती मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, राज्यात सध्या हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहे. दिवसभरातील कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान जवळपास सर्व केंद्रांवर सरासरीपेक्षा कमी नोंदवले जात आहेत, असे सांगितले.

प्रचंड आर्द्रतेमुळे घामाने अंघोळ

मुंबईचा पारा ३३ अंश सेल्सियस इतका नोंदवला. पुढचे काही दिवस मुंबईत कडक उन्हाचे चटके बसणार नाही. मात्र, प्रचंड आर्द्रतेमुळे घामाने अक्षरश: अंघोळ होत असल्याचे चित्र आहे. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले, अरबी समुद्राहून मुंबईकडे वाहणाऱ्या हवेत ओलावा आहे. शिवाय उत्तरेकडील हवेतही किंचित बदल होत आहेत. परिणामी हवेतल्या ओलाव्यामुळे तापमान ३५ ऐवजी ३२ अंशावर स्थिर असून, आणखी काही दिवस मुंबईकरांना दिलासा मिळेल.

कोकणात हवामान दमट राहाणार

कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिली आहे.

Web Title: Relief from heatwaves for the next few days Mumbai 33 degrees Celsius Mercury drops across the state

टॅग्स :Mumbaiमुंबई