नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:57 IST2025-12-31T07:54:21+5:302025-12-31T07:57:45+5:30
मुंबईत ४३ नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटे; भाजपच्या चार, तर शिंदेसेनेच्या एका आमदाराच्या घरात उमेदवारी, ठाण्यात भोईर कंपनीच्या घरातून पाच रिंगणात

नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
मुंबई / ठाणे : 'नातेवाईक उदंड झाले आणि कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले' अशी परिस्थिती महामुंबईत झाली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या महापालिकांमध्ये ३० नेते रिंगणात उतरले आहेत, तर अन्य काही नेत्यांनी आपल्या ११६ नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिली आहे.
मंगळवारी रात्री अकरानंतरही उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याचे काम सुरूच होते. आमदार, खासदार यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी उमेदवारी घेऊ नये, असे आदेश भाजपने दिले असतानाही ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या ४ विद्यमान आमदारांनी आपल्या कुटुंबीयांकरिता तिकिटे पदरात पाडून घेतली. मात्र याच आमदारांनी शिंदेसेनेसोबतच्या वाटाघाटीत ठाण्यात गेल्यावेळी निवडून आलेल्या नगरसेवकांपेक्षाही कमी जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.
शिंदेसेनेच्या एका आमदाराने आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळविली. सत्ताधारी पाच आमदारांसह माजी खासदार, आमदार व माजी नगरसेवकांनी आपल्या कुटुंबात तिकिटे वाटून घेतल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीतून दूर फेकला गेला.
मंत्री गणेश नाईक यांनी पुतणे सागर नाईक व सून वैष्णवी नाईक यांच्याकरिता तिकीट मिळविले. भिवंडीतील भाजप आ. महेश चौघुले यांनी रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू असले तरी हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई ४३, मीरा-भाईंदर १६, नवी मुंबई १३, कल्याण डोंबिवली १२, ठाणे उल्हासनगर प्रत्येकी ४, पनवेल भिवंडी प्रत्येकी ३ अशा ९८ नेत्यांनी आपापल्या नातेवाईकांसाठी उमेदवारी पदरात पाडून घेतल्याचे समोर आले आहे.
4
मुलगा मित चौघुले यांची उमेदवारी पक्की केली. भाजप आ. सुलभा गायकवाड यांनी जाऊ मनीषा अभिमन्यू गायकवाड यांची राजकीय वाट सुकर करून घेतली. भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी भावजय माजी महापौर डिंपल मेहता यांच्याकरिता प्रतिष्ठा पणाला लावून तिकीट पदरात पाहून घेतले. शिंदेसेनेचे आ. राजेश मोरे यांनी मुलगा हर्षल राजेश मोरे यांचे तिकीट व राजकारणातील स्थान पक्के केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजप नेते कपिल पाटील यांनी पुतण्या सुमित पाटील यांची उमेदवारी निश्चित केली. ठाण्यातील भोईर कंपनीचे अनेक सदस्य प्रत्येक निवडणुकीला रिंगणात असतात. यावेळीही भोईर कंपनीतील पाच जणांनी उमेदवारी मिळवली आहे. देवराम भोईर स्वतः, मुलगा संजय भोईर, पत्नी उषा भोईर, भावजय सपना भूषण भोईर यांनी शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळविली आहे.
कल्याण-डोंबिवलीत १२ नेत्यांचे चांगभलं
कल्याण-डोंबिवलीत १२ नेते, पदाधिकारी यांनी आपल्या कुटुंबाचे भले केले. उल्हासनगरात चार कुटुंबांच्या घरात पुढील पाच वर्षे सत्ता पाणी भरत राहणार आहे. भिवंडीत तीन बड्या नेत्यांनी आपल्या घरात तिकिटे आणली. यात चौघुले, पाटील यांच्याबरोबर माजी आ. रूपेश म्हात्रे यांनी भाऊ संजय म्हात्रे यांचे तिकीट पक्के केले.
नवी मुंबईत १३ मातब्बर नेत्यांनी घरात सत्तेचा वाटा ओढून घेतला, तर पनवेलमध्ये तीन नेत्यांनी नातलगांना तिकिटे मिळवून दिली. मिरा-भाईंदरमध्ये किमान १६ नेत्यांनी नातलगांचे चांगभले केले. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत कार्यकर्त्याला निवडून आणण्यापेक्षा मातब्बरांनी मुले, सुना, भाऊ यांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट दिसते.
मुंबईतील २२७ जागांसाठी भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) अशा सर्वच पक्षांतील माजी नगरसेवक, आमदार, खासदार, वरिष्ठ नेत्यांची मुले, भाऊ, बहीण, पत्नी, सून अशा ४३ नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनुभव, संघटनात्मक ताकद, जिंकण्याची क्षमता अशी कारणे पुढे करत पक्षांनी घराण्यातच उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अनेक प्रभागांत वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाचा प्रभाव आहे.