Join us

शरद पवारांच्या घराची रेकी, शारीरिक इजा अन् अस्वच्छ हेतू; जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 15:26 IST

शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबई- एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी शुक्रवारी केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद शनिवारी राज्यभरात उमटले. भाजपसह सर्वच पक्षांतील नेतेमंडळींनी  हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. हल्ला होईल, मोर्चा निघेल याची पोलिसांनी कल्पना होती, असेही तपासातून पुढे आल्याने पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याचे दिसत आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, परवा साहेबांच्या घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वछ नव्हता त्यांनी साहेबांच्या घराची रेकी केली होती आणि  त्यांना पवार साहेबाना शारीरिक इजा करायची होती .... महाराष्ट्राचे नशीब असे काही घडले नाही ....असं आव्हाडांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

काही जणांनी काही कर्मचारी बेपत्ता असल्याचेही सांगितले. मात्र हे कर्मचारी बेपत्ता नसून शुक्रवारी रात्री त्यांनी रेकी केल्यामुळे अटक केल्याचीही माहिती नंतर समोर आली. याबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय की, राष्ट्रवादी पक्ष आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, मात्र, चुकीच्या नेतृत्त्वाखाली पाठीशी नाही असेदेखील शरद पवार यांनी म्हटले आहे. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसंल असंदेखील पवार यांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. 

सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी-

सत्र न्यायालयात झालेल्या तीन तासांच्या युक्तिवादानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमदर्शनी पोलीस तपासात आरोपींविरोधात सक्षम पुरावे असल्याचे सांगत ही कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्ते यांचा जामीन अर्ज किल्ला कोर्टाने फेटाळला असून, त्यांना वरच्या कोर्टात जामीन अर्ज करण्याकरिता मुभा दिली आहे. दुसरीकडे, अटक करण्यात आलेल्या १०९ आंदोलकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यामध्ये, सदावर्तेंसह ११० जणांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. 

टॅग्स :शरद पवारजितेंद्र आव्हाडएसटी संपपोलिस