आजपासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:47+5:302021-03-08T04:06:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सोमवारपासून मराठा आरक्षणावरील सुनावणीस सुरुवात हाेत आहे. सध्या व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार ...

Regular hearing on Maratha reservation from today | आजपासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी

आजपासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सोमवारपासून मराठा आरक्षणावरील सुनावणीस सुरुवात हाेत आहे. सध्या व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार असून, सुनावणीसाठीची पूर्ण तयारी झाल्याचे मराठा क्रांती मोर्चा आणि आरक्षण समर्थकांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाबाबत जयश्री पाटील (सदावर्ते) विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व विनोद नारायण पाटील अशी ही सुनावणी होणार आहे. गेल्या महिन्यात दि. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ८,९ आणि १० मार्च हे तीन दिवस आरक्षणाच्या विरोधकांना, तर १२, १५, १६ आणि १७ मार्च असे चार दिवस राज्य सरकार तसेच याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने लढणारे वकील व इतर सर्व मराठा आरक्षणाचे समर्थक यांना आपली बाजू मांडण्यासाठी असतील. सोबतच १८ मार्च हा दिवस केंद्र सरकारला तामिळनाडूचे आरक्षण, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (इ.डब्लू.एस) चे आरक्षण आणि यात असलेली मर्यादा या सर्व मुद्द्यांवर आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

सुनावणी संदर्भात मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, या सुनावणीसाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे व ते आता कायद्याच्या चौकटीतही टिकेलच, असा मला पूर्ण विश्वास आहे. तर, सुनावणीसाठी गिरगाव येथील शारदामंदिर हायस्कूलच्या बोर्ड रूममध्ये प्रोजेक्टरची व्यवस्था केल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली. व्हीसीद्वारे सुनावणी असल्याने ही व्यवस्था केली आहे. जेणेकरून याचिकाकर्ते वकिलांना एकाच ठिकाणाहून सुनावणीसंदर्भातील व्यवस्था उपलब्ध होईल.

* प्रत्यक्ष सुनावणीसाठी राज्य सरकार आग्रही

मराठा आरक्षणाच्या सुनावणीची व्याप्ती लक्षात घेता प्रत्यक्ष सुनावणी व्हावी, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली होती. मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ समितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष सुनावणीचा आग्रह धरणार असल्याचे विधान परिषदेत स्पष्ट केले होते. सध्या सर्वोच्च न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावण्या होत आहेत. १५ मार्चपासून सर्वोच्च न्यायालया प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याबाबत चर्चा आहे. त्यामुळे कदाचित १५ तारखेपासून मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्यक्ष सुनावणी करण्यास न्यायालय तयार होईल आणि मधल्या काळातील तारखा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यताही यासंदर्भातील जाणकारांनी व्यक्त केली.

-------------------

Web Title: Regular hearing on Maratha reservation from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.