MHT CET 2026: सीईटी परीक्षांच्या नोंदणीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:02 IST2026-01-06T14:02:29+5:302026-01-06T14:02:29+5:30
MHT CET 2026 Registration Date: वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे.

MHT CET 2026: सीईटी परीक्षांच्या नोंदणीला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमपीएड आणि एमएड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सोमवारपासून सुरुवात केली. विद्यार्थ्यांना २० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार असून त्याचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे.
सीईटी सेलकडून घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांना २४ मार्चपासून सुरुवात केली जाणार आहे. त्याचे तात्पुरते वेळापत्रक सीईटी सेलने गेल्या महिन्यात जाहीर केले होते. आता नोंदणीला ही सीईटी सेलने सुरुवात केली असून ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेळापत्रक जाहीर
एम.पी.एड. फिल्ड टेस्टची ऑफलाइन परीक्षा २५ मार्चला हाेणार आहे. या दोन्ही सीईटी परीक्षेसाठी मागील वर्षी ६,१९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा सीईटीकडून कला, तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या १७ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
‘अपार’ बंधनकारक
विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे यासाठी सीईटी सेलने प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्यांना युनिक डिसॲबिलिटी आयडी (यूडीआयडी ) बंधनकारक केला आहे.
अपार, यूडीआयडीद्वारे पडताळणी हाेणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अपार तयार केलेला नाही त्यांनी तो डिजिलॉकरद्वारे तयार करावा, असे आवाहन सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले.