'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:58 IST2025-12-19T12:58:05+5:302025-12-19T12:58:25+5:30
कुर्ला (पूर्व) येथील रहिवासी रमेश सत्यन बोरवा यांनी दाखल केलेल्या तक्रारीला मंजुरी देताना विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
मुंबई : सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेल्या म्हाडाच्या जमिनीवर अतिक्रमण आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपांप्रकरणी विशेष एसीबी न्यायालयाने शिंदेसेनेचे आ. मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला (एसीबी) गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश बुधवारी दिले.
कुर्ला (पूर्व) येथील रहिवासी रमेश सत्यन बोरवा यांनी दाखल केलेल्या तक्रारीला मंजुरी देताना विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. तक्रारीनुसार, म्हाडाने सार्वजनिक सुविधा व उद्यानासाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर तीन वेळा आमदार झालेल्या कुडाळकर यांनी अनधिकृतपणे एक सभागृह तसेच अनेक व्यावसायिक गाळे उभारल्याचा आरोप बोरवा यांनी केला आहे. तक्रार व सादर केलेल्या कागदपत्रांत म्हाडाने जारी केलेला विशेष न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याचे निर्देश दिले.
पत्रव्यवहारही समाविष्ट आहे, याची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, म्हाडाने सार्वजनिक सुविधा व उद्यानासाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर काही व्यावसायिक केंद्रासह एक सभागृह अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचे दिसून येते. कुडाळकरांविरोधातील आरोप 'विशिष्ट स्वरूपाचे' असून, तक्रारदाराने दाखल केलेल्या शपथपत्राद्वारे त्याचे समर्थन होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायालय काय म्हणाले?
हे आरोप गंभीर स्वरूपाचे असून सार्वजनिक मालमत्तेवरील अनधिकृत बांधकामांशी संबंधित आहेत आणि त्यामुळे चौकशी आवश्यक आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १७५ (३) नुसार नेहरू नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना गुन्हा दाखल करून सखोल तपास करून अंतिम अहवाल या न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देणे योग्य ठरेल, असे न्यायालयाने म्हटले. मात्र, अखेरीस न्यायालयाने सहायक पोलिस आयुक्त, एसीबी यांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले.