मरोळ मासळी बाजाराचा मस्त्य विभागातर्फे पुनर्विकास; अनेक वर्षांपासून रखडलेले काम सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:12 IST2025-07-22T13:11:57+5:302025-07-22T13:12:34+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या मरोळ मासळी बाजार, नवलकर मार्केट, दत्ताजी साळवी मंडई, निर्मलाताई रागिणवार मंडईच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

मरोळ मासळी बाजाराचा मस्त्य विभागातर्फे पुनर्विकास; अनेक वर्षांपासून रखडलेले काम सुरू होणार
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या मरोळ मासळी बाजार, नवलकर मार्केट, दत्ताजी साळवी मंडई, निर्मलाताई रागिणवार मंडईच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यातील मरोळ फिश मार्केटचा पुनर्विकास मस्त्य विभागातर्फे करण्यात येणार असून त्यासाठी महापालिका आपल्या हिश्श्याचा निधी त्यासाठी देणार आहे. उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत माहिती दिली.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळातील शिंदे यांच्या दालनात ही बैठक पार पडली. यावेळी खा. रवींद्र वायकर उपस्थित होते. या विभागात मरोळ मासळी बाजार, नवलकर मार्केट, निर्मलाताई रागिनवार, दत्ताजी साळवी मंडई, जे. व्ही. पी. डी., वर्सोवा मार्केट असून त्यातील अनेक मार्केटची दुरवस्था झाली आहे. काही मार्केटच्या विकासासाबाबत महापालिकेने अद्याप कुठलाच निर्णय घेतलेला नाही. जीर्णावस्थेत असलेल्या मरोळ फिश मार्केटचा तातडी पुनर्विकास करावा, अशी मागणी येथील सुकी मासळी विक्रेत्यांनी केली होती. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
नवलकर मार्केटसाठी लवकरच निविदा
यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की, मरोळ मार्केटचा पुनर्विकास मस्त्य विभागातर्फे करण्यात येणार आहे. तसेच नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा आराखडा मंजूर करण्यात आला असून लवकरच त्याची निविदा काढण्यात येईल.