एसटीत लवकरच नोकरभरती, प्रस्ताव शासनाकडे; राज्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 04:22 IST2025-05-13T04:22:32+5:302025-05-13T04:22:36+5:30

सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे.

recruitment in st soon proposal to the government information from state transport minister pratap sarnaik | एसटीत लवकरच नोकरभरती, प्रस्ताव शासनाकडे; राज्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती

एसटीत लवकरच नोकरभरती, प्रस्ताव शासनाकडे; राज्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आता शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. भविष्यात पीपीपी तत्त्वावर  विकसित होणाऱ्या महामंडळाच्या जागेबाबत एसटीच्या बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. यापूर्वी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन एसटीतील नोकर भरतीला २०२४ पर्यंत उच्च न्यायालयाने मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या आहे. या कर्मचाऱ्यांसह अभियंत्यांची रिक्त पदे करार पद्धतीने आणि सरळसेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. 

एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात २५ हजार बस घेण्यात येणार आहेत. त्यासाठी चालक, वाहक पदाबरोबरच अन्य पदे भरण्याच्या ठरावाला संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. भविष्यात वाढत्या बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधालाही शासनाकडून मंजुरी घेण्यात येईल. या अनुषंगाने प्रत्येक विभागाने स्वत:कडील रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक पदांच्या भरतीसंदर्भात  एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश देण्यात आल्याचेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्यबळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार आहे. त्या अनुषंगाने आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.

 

Web Title: recruitment in st soon proposal to the government information from state transport minister pratap sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.