विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:10 IST2025-03-16T12:09:08+5:302025-03-16T12:10:05+5:30
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याने रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे रक्त मिळविण्यासाठी तगादा लावतात. कारण, उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते.

विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला
मुंबई : गेल्या काही वर्षांत राज्यात विक्रमी रक्तदान करण्यात आल्याची नोंद झाली. गेल्या वर्षी २१ लाखांपेक्षा अधिक युनिट रक्त जमा झाले होते. मात्र, विक्रमी रक्तदान होत असले तरी दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. त्यामुळे आयोजकांनी एकाच वेळी रक्तदान शिबिरे भरविण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने भरवावीत, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याने रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे रक्त मिळविण्यासाठी तगादा लावतात. कारण, उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. परिणामी, रक्ताची टंचाई निर्माण होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि नंतर लागणाऱ्या सुट्यांमुळे हा तरुण रक्तदाता वर्ग रक्तदान करीत नाही. त्याशिवाय कॉर्पोरेट आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी मे-जूनच्या काळात रजेवर असल्यामुळे शिबिरे आयोजित केली जात नाहीत. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवतो.
वर्ष रक्तकेंद्रे एकूण संकलन पैकी स्वेच्छेने
(लाख) (लाख)
२०२२ ३६८ १९. २८ १९. ०८
२०२३ ३७५ २०.४४ २०.३६
२०२४ ३९३ २१.५९ २१.४९
आम्ही रक्तदान केंद्रांना आणि रक्तदान शिबिर आयोजकांना सूचना देत असतो की, टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. जेणेकरून वर्षभर नियमित रक्त संकलित होऊ शकेल. उन्हाळ्यात टंचाई भासू नये त्यासाठी रक्तदान केंद्रांना पत्रद्वारे कळविले आहे. रक्त संकलनाचा आपल्याकडे वर्षागणिक आकडा वाढत आहे. स्वेच्छेने रक्तदान करण्याचे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे.
डॉ. महेंद्र केंद्रे, सहायक संचालक राज्य रक्तसंक्रमण परिषद
एक विशिष्ट कालावधीनंतर संकलित रक्त जाते वाया
एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय मंडळी, त्यांच्या नेत्यांचा वाढदिवस आणि पक्षाच्या वर्धापनदिनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. त्यामुळे एकाच वेळी राज्यात मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होते. मागणीपेक्षा अधिक रक्त जमा होते. मात्र, रक्तसंकलन नियमितपणे, नियोजित पद्धतीने केल्यास रक्ताची चणचण भासणार नाही. तसेच रक्त वापरण्याचा एक विशिष्ट कालावधी ठरलेला असतो. त्यानंतर रक्त राहिल्यास ते वाया जाते, ते होणार नाही.
२१ लाख युनिट रक्तदानाची नोंद
महाराष्ट्र आर्थिक अहवालात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २०२४ मध्ये, राज्यात २१ लाख युनिट विक्रमी रक्तदानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात सुरक्षित रक्ताचा व रक्त घटकांचा पुरेसा पुरवठा वाजवी दरात करणे हे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सन २००० पासून सिकलसेल ग्रस्त बालके तसेच थॅलेसेमिया व हिमोफेलियाने पीडित रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो.
२०२४ मध्ये राज्यात सिकलसेलच्या १५३९, थॅलेसेमियाच्या १,१११, तर हिमोफेलियाच्या ३१५ रुग्णांना नियमित मोफत रक्त देण्यात आले आहे.