प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 05:08 IST2025-05-08T05:07:50+5:302025-05-08T05:08:00+5:30

गुगल मॅप्सच्या भारतातील प्रमुख रोली अग्रवाल, म्हणाल्या, की ‘सार्वजनिक वाहतुकीची अचूक माहिती देण्यास गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे. हे त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’

Real-time facility of 'BEST' for passengers; Chief Minister Fadnavis inaugurates the initiative | प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 

प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसची रिअल-टाइम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत करून त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या प्रणालीच्या उद्घाटन कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणती बस कधी उपलब्ध होईल, ती मिळण्याची अचूक वेळ सहज उपलब्ध होतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. बेस्ट व गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने  एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे बेस्टच्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. 

महत्त्वाचे पाऊल
गुगल मॅप्सच्या भारतातील प्रमुख रोली अग्रवाल, म्हणाल्या, की ‘सार्वजनिक वाहतुकीची अचूक माहिती देण्यास गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे. हे त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’

असे पाहा बसचे रिअल-टाइम लोकेशन 
मोबाइलवर गुगल मॅप्स ॲप उघडा.
प्रवासाचे ठिकाण टाकून ‘गो’ आयकॉनवर क्लिक करा.
ट्रामच्या चिन्हावर टॅप करून ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ मोड निवडा.
सुचवलेली सेवा निवडून बसचे थांबे आणि रिअल-टाइम माहिती तपासा.
एखाद्या बस स्टॉपसाठी सर्च करूनही रिअल-टाइम बस माहिती पाहता येईल.

प्रवाशांना मोबाइलवरच बस कुठे आहे, किती वेळात येईल, विलंब झाला आहे का, याची माहिती मिळणार आहे. गुगल मॅपवर ही माहिती हिरव्या आणि लाल रंगात दाखवली जाईल. हिरवा रंग वेळेत येणाऱ्या, तर लाल रंग उशीर होणाऱ्या बस दर्शवेल.’
एस. व्ही. आर. श्रीनिवास, महाव्यवस्थापक, ‘बेस्ट’

Web Title: Real-time facility of 'BEST' for passengers; Chief Minister Fadnavis inaugurates the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट