नरिमन पॉइंटपासून मिरा-भाईंदर गाठा अवघ्या अर्ध्या तासात; मिठागराची जमीन हस्तांतरित, मोठा अडथळा दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 05:39 IST2025-09-22T05:38:23+5:302025-09-22T05:39:21+5:30

दहिसर ते भाईंदर हा महामार्ग ३ वर्षांत तयार होईल. त्यानंतर नरिमन पॉइंटहून मिरा-भाईंदर कोस्टलमार्गे अर्ध्या तासात कापता येईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली

Reach Mira-Bhayander from Nariman Point in just half an hour; Union Salt Ministry transfers its land to state government | नरिमन पॉइंटपासून मिरा-भाईंदर गाठा अवघ्या अर्ध्या तासात; मिठागराची जमीन हस्तांतरित, मोठा अडथळा दूर

नरिमन पॉइंटपासून मिरा-भाईंदर गाठा अवघ्या अर्ध्या तासात; मिठागराची जमीन हस्तांतरित, मोठा अडथळा दूर

मुंबई : नरिमन पॉइंटवरून मिरा-भाईंदर हे अंतर कापताना वाहतूककोंडी, खड्ड्यांसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पावणेदोन तासांहून अधिक वेळ खर्ची पडतो. मात्र,  हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापता येणार आहे. केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला असून कोस्टल रोडमार्गे नरिमन पॉईंटहून मिरा-भाईंदरला सुसाट जाता येणार आहे.

दहिसर ते भाईंदर हा महामार्ग ३ वर्षांत तयार होईल. त्यानंतर नरिमन पॉइंटहून मिरा-भाईंदर कोस्टलमार्गे अर्ध्या तासात कापता येईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.  राज्य शासन आणि केंद्रीय मिठागार मंत्रालयाकडे  पाठपुरावा केला. त्यानंतर दहिसर- भाईंदर या ६० मीटर रस्त्याच्या मार्गातील ५३.१७ एकर जागा केंद्रीय मिठागार मंत्रालयाने  मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यास मंजुरी दिली. 

कोस्टल रोड उत्तनपर्यंत जाणार
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोड हा उत्तनपर्यंत जाणार आहे. तेथून दहिसर-भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मीरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत येऊन तिथून वसई विरार या दोन शहराला जोडला जाणार आहे. या रस्त्याची निविदा यापूर्वीच काढली आहे. हे काम एल ॲड टी ही कंपनी करणार असून, पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यासाठी येणारा तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे.

कोस्टल रोडचा समुद्र किनाऱ्याला धोका नाही
कोस्टल रोड हा उत्तन येथून समुद्रकिनाऱ्यावरून विरारकडे जाणार होता. परंतु, त्यामुळे मासेमारीवर आणि पर्यायाने उपजीविकेवर परिणाम होण्याच्या भीतीने त्याला कोळी बांधवांनी कडाडून विरोध केला होता. प्रताप सरनाईक यांनी कोळी बांधवांची ही व्यथा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडली आणि त्यांच्या मागणीला मान्यता मिळवली. त्यामुळे हा मार्ग समुद्रकिनाऱ्यावरून जाण्याऐवजी उत्तन ते दहिसर आणि तेथून मीरा-भाईंदरमार्गे वसई विरारकडे जमीनमार्गे जाणार आहे.

मार्गातील अडथळा दूर
जमिन हस्तांतरीत झाल्याने दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई-विरारकडे जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Web Title: Reach Mira-Bhayander from Nariman Point in just half an hour; Union Salt Ministry transfers its land to state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.