एक हजार उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन चुकीचे; युवासेनेने कुलगुरूंसमोर वाचला समस्यांचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 08:29 IST2025-07-28T08:29:50+5:302025-07-28T08:29:50+5:30

सिनेट बैठकीआधी युवा सेनेने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर फलक घेऊन आंदोलन केले.

re evaluation of one thousand answer sheets wrong yuva sena read out the problems before the vice chancellor | एक हजार उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन चुकीचे; युवासेनेने कुलगुरूंसमोर वाचला समस्यांचा पाढा

एक हजार उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन चुकीचे; युवासेनेने कुलगुरूंसमोर वाचला समस्यांचा पाढा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विद्यापीठाने इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या एक हजारहून अधिक उत्तरपत्रिकांचे चुकीचे पुनर्मूल्यांकन केल्याचा मुद्दा रविवारी सिनेट बैठकीत वादळी ठरला. यावेळी युवासेनेच्या सदस्यांनी चुकीचे पुनर्मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांच्या प्रती थेट कुलगुरू यांच्याकडे देत विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत होणारा गोंधळ कधी सुटणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मुंबई विद्यापीठाच्या २०२५ मधील उन्हाळी सत्राच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी १२,६४२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी तब्बल ५,३७० उत्तरपत्रिकांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे विद्यापीठाने सिनेट बैठकीत सांगितले. आता विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीतील चुकाच युवासेनेने दाखविल्या. सिनेट बैठकीआधी इंजिनीअरिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर दाखल झाले होते.

उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटींबाबत विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे, कुलसचिव आणि परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे सिनेट बैठकीत तरी विद्यापीठ प्रशासनाकडून हा मुद्दा सोडवला जाईल, या आशेवर विद्यार्थी येथे आले होते. विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांना कोणीही भेट दिली नाही, अशी माहिती युवासेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी दिली.

प्रवेशद्वारावर आंदोलन 

सिनेट बैठकीआधी युवा सेनेने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर फलक घेऊन आंदोलन केले. एआयटीएला दिलेली जागा कधी परत घेणार, एमएमआरडीएला दिलेल्या जागेचे १२०० कोटी एमएमआरडीएला कधी मिळणार, मादाम कामा वसतिगृहाला पूर्णवेळ अधीक्षिका मिळणार का?, परीक्षा भवनचा गोंधळ थांबणार कधी?, मुंबई विद्यापीठावर लादलेला जीएसटी रद्द होणार का? आदी विषयांचे फलक घेऊन युवासेनेने हे आंदोलन केले. तसेच विद्यापीठाच्या कारभाराचा निषेध केला.

तीन मिनिटांच्या आत उत्तरतपासणी? 

यापूर्वी उत्तरपत्रिकेतील एक प्रश्न तपासण्यासाठी ३ मिनिटांचा वेळ लागत होता. त्यापेक्षा कमी वेळात उत्तर तपासल्यास उत्तरपत्रिका लॉक होत असे. मात्र आता विद्यापीठाने ३ मिनिटांची अट काढली आहे. त्यातून ३ मिनिटांपेक्षा कमी वेळातही एका प्रश्नाचे उत्तर तपासले जाते. त्यामुळे उत्तर तपासणीच्या गुणवत्तेवरही युवा सेनेचे नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला.

 

Web Title: re evaluation of one thousand answer sheets wrong yuva sena read out the problems before the vice chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.