Join us

मंत्रिपद नाकारलेल्या रवींद्र वायकरांची मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्य समन्वयकपदी वर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 17:47 IST

जिल्हास्तरावर आणि विभाग स्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरिता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आले आहे.

मुंबई - मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत आहे. गेल्या सरकारच्या काळात रवींद्र वायकर यांना पक्षाकडून राज्यमंत्रिपद दिलं होतं. त्यावेळी शिवसेना-भाजपा पक्ष सत्तेत होते. 

यंदा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय उलथापालथ झाली. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला १५ मंत्रिपदे आणि मुख्यमंत्रिपद आलं. यामध्ये रवींद्र वायकरांना पुन्हा मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र शिवसेनेच्या कोट्यातून मित्रपक्षांच्या काही आमदारांना मंत्रिपद दिलं त्यामुळे वायकरांचा पत्ता कट झाला. मंत्रिपद न मिळाल्याने रवींद्र वायकर नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाच्या मुख्य समन्वयकपदाची जबाबदारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठया प्रमाणावर नागरिक निवेदने, तकारी, गा-हाणी घेवून येत असतात. अशा भेटण्याकरीता येणा-या सर्व नागरिकांची निवेदने, तक्रारी व गाऱ्हाणी समजावून घेवून मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात जेष्ठ व अनुभवी व्यक्तीची आवश्यकता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. 

त्याचसोबत जिल्हास्तरावर आणि विभाग स्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरिता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आले आहे. त्याची व्याप्ती जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या सर्व कार्यालयांच्या समन्वयासाठी देखील प्रशासकीय अनुभव असणारे रवींद्र वायकर काम पाहतील. रवींद्र वायकर यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्य कक्षातील अधिकारी- कर्मचारी  देण्यात येतील असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. 

दरम्यान, याबाबत बोलताना वायकर म्हणाले की, सत्ताधारी पक्षांच्या आमदारांसोबत विरोधी पक्षाच्या आमदारांनाही न्याय देणार असल्याचं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :रवींद्र वायकरउद्धव ठाकरेमुख्यमंत्रीशिवसेना