Join us  

काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राऊतांची माघार; राजघराण्याच्या वक्तव्यावर पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 1:47 AM

इंदिरा गांधी यांच्याबाबतचे विधान मागे : वंशजांबद्दलच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद

मुंबई : काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेले विधान मागे घेतले. माझ्या वक्तव्याने कोणी दुखावले असेल, तर मी ते मागे घेतो, अशा शब्दांत राऊत यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण यापुढे अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

पुणे येथे लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाची भेट घेतली होती, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावर कॉँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, आदी नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

बुधवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की ‘करीम लाला हे पठाणांच्या स्पख्तुन -ए-हिंद संघटनेचे ते नेतृत्वही करत होते. पठाण संघटनेचा नेता म्हणून करीम लाला देशातील अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेत असत. पठाण नेता म्हणूनच त्यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती.ज्यांना इतिहास माहीत नाही अशा मंडळींनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असा दावा करून राऊत म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्याबद्दल माझ्याइतका आदर कुणी दाखवला नसेल. इंदिरा गांधी यांच्यावर टीका होत असे, तेव्हा काँग्रेसमधील मित्र गप्प बसायचे. पण मी कायमच त्यांची बाजू उचलून धरायचो. परंतु माझ्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेला ठेच पोहचली, असे वाटत असेल, तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे ते म्हणाले.

राऊत यांच्या विधानावरून काँग्रेस व भाजपमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या आरोपंवर सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी गप्प का आहेत?, असा सवाल केला. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची सवय सोडावी. छत्रपती शिवरायांचा अपमान करून गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी इंदिरा गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत.वादावर पडदा पडला पण... : थोरातइंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतल्याने वादावर पडला आहे. पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. आमच्या नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर खपवून घेणार नाही. इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. १९७५ सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. ज्या करीम लालाबद्दल बोलले जात आहे त्याच्यासकट हाजी मस्तान, युसुफ पटेलसारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधितांना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

शिवसैनिकांकडून अपशब्द येणार नाहीत : आदित्यराऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना इंदिरा गांधींबद्दल आदर होता. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाकडून त्यांच्याबद्दल अपशब्द येणार नाही. राऊत यांनी केलेले विधान वेगळ्या संदर्भात होते, त्यांचे ते निरिक्षण होते. त्यामुळे प्रत्येक विधान हे त्या संदर्भातून पाहणे गरजेचे आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.उदयनराजे समर्थकांकडून निषेधछत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावा द्या, या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ माजी खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन केले. त्यामुळे दिवसभर सातारा बंद राहिला. सातारा शहरासह नागठाणे, वाई या परिसरातही उदयनराजे समर्थकांनी निषेध मोर्चे काढले. तर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी १७ जानेवारी रोजी सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. सोलापुरात राऊत यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.मनसेकडूनही टीका : राज ठाकरेंच्या समर्थकांनी आपली गाडी जाळली होती, या संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध करत ‘राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला.

 

 

टॅग्स :संजय राऊतकाँग्रेसउदयनराजे भोसलेमनसे