Join us

आधी ‘वर्षा’, मग ‘सिल्व्हर ओक’वर; वेगवान घडामोडींमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 06:49 IST

पवार, उद्धव ठाकरे यांच्यात राऊतांची ‘शिष्टाई’

ठळक मुद्देराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात होत असताना आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झालीच पाहिजे, असा काँग्रेसचा आग्रह असताना घडामोडींना अचानक वेग आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेले खासदार संजय राऊत यांनी सोमवारी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘वर्षा’वर एक तास चर्चा केल्यानंतर ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी वीस मिनिटे चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात होत असताना आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झालीच पाहिजे, असा काँग्रेसचा आग्रह असताना घडामोडींना अचानक वेग आला आहे. तोंडावर आलेले पावसाळी अधिवेशन, आ. प्रताप  सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, माजी मंत्री अनिल देशमुख यांना ईडीने बजावलेले समन्स, अनिल परब यांच्यासह आणखी दोन मंत्री ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडू शकतात असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

राऊत हे एका आठवड्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना भेटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलिकडे स्वबळाचा नारा दिल्यानंतर तसे होणार असेल तर शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रितपणे लढतील, असे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हटले होते. तसेच हे सरकार उत्तम चाललंय आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी स्पष्टोक्ती स्वत: शरद पवार यांनी रविवारी बारामती येथे दिली होती.

काेणता निरोप पोहोचवला? :  

ठाकरे यांचा कोणता निरोप राऊत यांनी पवारांकडे पोहोचवला, याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. पवार आणि ठाकरे यांच्यात काही विसंवाद आहे का आणि तो दूर करण्यासाठी राऊत यांनी शिष्टाई केली का, अशी शंकाही उपस्थित होत आहे. पवार अलिकडे दोनदा ठाकरे यांना जाऊन भेटले होते. यावेळी ते स्वत: गेले नाहीत. त्याऐवजी राऊत यांचा संवादपूल म्हणून उपयोग करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांचा निरोप तुम्हाला कशाला सांगू?

नेत्यांना मी सहज भेटलो. काहीही घडामोडी नाहीत. मुख्यमंत्र्यांचा निरोप असेल तर तुम्हाला कशाला सांगू? पवार साहेबांना सांगेन. हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल. ठाकरे चांगले काम करत आहेत, असे पवार यांनी आधीच म्हटले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या नेतृत्त्वात हे सरकार चालेल.     - खा. संजय राऊत 

टॅग्स :मुंबईशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरे