Join us  

मोदींबद्दल आदर व्यक्त करीत राऊत यांचा शहांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 5:10 AM

शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी इस्पितळातून बाहेर पडताच गुरुवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला.

मुंबई : शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी इस्पितळातून बाहेर पडताच गुरुवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. शहा यांनी नरेंद्र मोदींपासून सत्य लपून का ठेवले? असा सवाल करत कुणीतरी पंतप्रधान मोदी आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पहिल्यांदाच राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी व मी जाहीर भाषणातून केली. त्यावेळी शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, असे वक्तव्य अमित शाहा यांनी केले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले. पंतप्रधानांना खोटे पाडण्याची आमची इच्छा नव्हती. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला असता. आम्हाला मोदी आदरणीय आहेत आणि नेहमी राहतील. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला नाही. मात्र, आम्हीही शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समसमान वाटपाचा वारंवार उल्लेख केला. त्यावेळी भाजपने का आक्षेप घेतला नाही, अशी विचारणा राऊत यांनी केली.बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. हे मोदींपर्यंत पोहोचविले गेले नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. बंद दाराआड झालेली चर्चा काय होती हे अमित शाह यांनी उघड करावे. कारण ही चर्चा ज्या ठिकाणी झाली ती जागा साधीसुधी नाही. मातोश्रीवरील ज्या खोलीमध्ये शाह आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली ती बाळासाहेबांची खोली होती. याच खोलीमध्ये बसून बाळासाहेबांनी अटलजी, आडवाणींपासून मोदींपर्यंत अनेकांना आशीर्वाद दिले आहेत.ही खोली आमच्यासाठी मंदिर आहे. येथे झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. या खोलीतच मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, हे मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, असे संजय राऊत म्हणाले.>आम्ही व्यापारी नाही, राजकारण हा आमचा धंदा नाही. भीती आणि धमक्यांना आम्ही भीत नाही, जे आम्हाला भिती दाखवतील त्यांना आम्ही धडा शिकवू. - खा. संजय राऊत

टॅग्स :संजय राऊतमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाभाजपा