Ratan Tata appointed as chairman of Mumbai university advisory council kkg | विद्यापीठाच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी रतन टाटा यांची सल्लागार परिषदेवर नियुक्ती

विद्यापीठाच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी रतन टाटा यांची सल्लागार परिषदेवर नियुक्ती

मुंबई : रतन टाटा यांच्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आणि आणि शैक्षणिक, औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव आता मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच विद्यापीठात संशोधन व विकासविषयक धोरणे व कृती योजना याबाबत लवकरच शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्याकडून कार्यवाही होणार आहे. कारण मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर रतन टाटा आणि अनिल काकोडकर यांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या नियमानुसार ही नियुक्ती केली असून महाराष्ट्र सरकारच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे.

उपायात्मक नियोजनासंबंधी विद्यापीठाला सल्ला देऊन विद्यापीठाच्या विकासासाठी विशेष काम हाती घेण्याचा पूर्ण अधिकार सल्लागार समितीच्या अध्यक्षास असतो. त्यामुळे सल्लागार परिषदेवर अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्या नामनिर्देशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशासन यासंबंधीचे अहवाल कृती योजना सादर करून त्याद्वारे कुलगुरूंना सल्ला देणे, वित्तीय साधनसंपत्ती व सुशासन निर्माण करणे, जेणेकरून विद्यापीठ शैक्षणिकदृष्ट्या सशक्त, प्रशासनिकदृष्ट्या कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम व्यवस्था निर्माण करणे, यासाठी विद्यापीठाची सल्लागार परिषद काम करणार आहे.

देशासह विदेशातील परिवर्तित होणाऱ्या शिक्षण पद्धतीत सर्वानुभवी, परिपक्व अशा रतन टाटा आणि डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन आणि साहाय्य लाभणार आहे. विद्यापीठाच्या पुढील १० ते २० वर्षांच्या दीर्घ ध्येय-धोरण निश्चितीसाठी याचा खूप मोठा फायदा होईल. विद्यापीठाच्या जागतिक पातळीवरील संशोधन, नवोपक्रम, नवसंकल्पनांवर भर देऊन देश-विदेशातील चांगली गुणवत्ता आकर्षित करण्यावर गरजाधारित आणि निकडीच्या क्षेत्रात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, जागतिक पातळीवर सहकार्य आणि या सर्वांसाठी आवश्यक भौतिक सुविधा तयार करण्यासाठी या सर्व महनीय व्यक्तींचे बहुमोल सहकार्य लाभेल. यांच्या नियुक्तीमुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विद्यापीठास त्यांच्या नियुक्तीचा सार्थ अभिमान असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

Web Title: Ratan Tata appointed as chairman of Mumbai university advisory council kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.