लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. उद्धव यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे यांनी राज यांचे स्वागत केले. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक याचा विवाह सोहळा रविवारी मुंबईतील ताज लँड्स एण्ड या हॉटेलमध्ये झाला. पाटणकर कुटुंबीयांच्या निमंत्रणाला मान देत राज ठाकरे लग्नाला आले होते. मात्र, सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधूंची प्रत्यक्षात भेट झाली नाही. निवडणुकीत उद्धव आणि राज यांनी एकमेकांवर टीका केली होती. परंतु, मनसे आणि उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने जोर धरला होता.