Ranjitsinh Mohite-Patil ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात भाजपा कारवाई करण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी मोहिते पाटील यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. दरम्यान, आता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या नोटीसला उत्तर दिले आहे.
'दमानिया सिलेक्टेड प्रोग्रॅम राबवतात, कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
या उत्तरात मोहिते पाटील यांनी कुठेही पक्षविरोधी भूमिका मांडलेली नाही असे उत्तर दिले आहे. पण, आता पक्षाकडून सबळ पुराव्याच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीपासून आरोप
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवून माढा जागेवर विजय मिळवला. या निवडणुकीपासून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशीरस विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्याविरोधात काम केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरुन त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
माळशीरस विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून राम सातपुते यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत राम सातपुते यांचा पराभव झाला. यानंतर सातपुते यांनी त्यांच्याविरोधात पक्षाकडे तक्रार केली होती. माझा पराभव हा रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. यानंतर भाजपाकडून मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. यावर मोहिते पाटील यांनी उत्तरात पक्षविरोधी कोणतेही काम केले नाही, पक्षविरोधी कोणतीही भूमिका मांडलेली नाही असं उत्तरात सांगितले आहे.