Ranjitsinh Deol will replace Aswini Bhide in Mumbai Metro | मुंबई मेट्रोत भिडेंच्या जागी रणजीतसिंह देओल
मुंबई मेट्रोत भिडेंच्या जागी रणजीतसिंह देओल

मुंबई : आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्यांचे सत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवले असून आज तब्बल २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

मेट्रो वूमन’ म्हणून ख्याती मिळविलेल्या मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांची भिडेंच्या जागी बदली करण्यात आली आहे. भिडे यांना अद्याप नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही. वादग्रस्त सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना भाजपच्या अधिपत्याखालील नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे. संपदा मेहता यांची बदली विक्रीकर सहआयुक्त, मुंबई या पदावर, तर मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव आर. डी. निवतकर यांची बदली जिल्हाधिकारी मुंबई शहर या पदावर करण्यात आली.

याशिवाय, प्राजक्ता लवंगारे, दिनेश वाघमारे, पराग जैन-नानोटिया यांचीही बदली करण्यात आली. लवंगारे यांना मराठी भाषा विभागात पाठवून ‘साइडपोस्टिंग’ देण्यामागे प्रशासकीय वर्तुळातील राजकारण असल्याची जोरदार चर्चा आहे. मेट्रोच्या आरे येथील कारशेडवरून शिवसेनेचे नेते आणि आताचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात फडणवीस सरकारच्या काळात जोरदार टिष्ट्वटरयुद्ध गाजले होते. 


महाराष्ट्र पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशनचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांची बदली त्याच पदावर ग्रामविकास व जलसंवर्धन विभागात करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची बदली महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली. आतापर्यंत महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेले पराग जैन-नानोटिया हे सामाजिक न्याय विभागाचे नवे प्रधान सचिव असतील.
मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त आर. आर. जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव असतील.
उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे या मराठी भाषा विभागाच्या नव्या सचिव असतील. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुणे महापालिकेचे आयुक्त असलेले सौरभ राव हे आता नवे साखर आयुक्त असतील. पुणे येथे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची बदली सहकार आयुक्त व रजिस्ट्रार; सहकारी संस्था; पुणे या पदावर करण्यात आली. कवडे यांच्या जागी येत असलेले ओमप्रकाश देशमुख हे आतापर्यंत पुणे येथे अतिरिक्त पुनर्वसन आयुक्त आणि अतिरिक्त संचालक; भूमिअभिलेख होते. त्या पदावर आता आनंद रायते यांची बदली करण्यात आली आहे.
पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय महसूल आयुक्त एस. एस. डुंबरे यांची बदली मेडा; पुण्याचे महासंचालक म्हणून करण्यात आली. मेडाचे महासंचालक कांतिलाल उमप उत्पादन शुल्क विभागाचे नवे आयुक्त असतील. मुंबई शहराचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची बदली सामान्य प्रशासन विभागात सचिव म्हणून करण्यात आली. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे त्याच पदावर पुणे जिल्हा परिषदेत जात आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव हे त्याच पदावर अकोला जिल्हा परिषदेत जात आहेत. कृषी विभागाचे उपसचिव किरण पाटील यांची बदली त्याच पदावर मुख्य सचिव कार्यालयात झाली आहे.

गडकरी, फडणवीसांच्या नागपुरात तुकाराम मुंढे
वादग्रस्त अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात महापालिका आयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे. महापालिका असो वा जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींशी मुंढे यांचा संघर्ष होत आला आहे. त्यांना नागपुरात पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपची डोकेदुखी वाढविल्याचे मानले जाते. मुंढे हे आतापर्यंत एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नजीकच्या मानल्या जाणाऱ्या काही अधिकाऱ्यांना कमी महत्त्वाच्या पदावर पाठविण्यात आल्याचे बदल्यांवरून दिसते.

राजीव निवतकर मुंबई शहराचे जिल्हाधिकारी
मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजीव निवतकर यांची मुंबई शहर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय प्रशासन सेवेतील २०१० च्या तुकडीतील निवतकर यांनी आतापर्यंत विविध प्रशासकीय पदांवर काम केले आहे. १९९४ साली त्यांची प्रथम उपजिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. विद्यमान जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या जागी आता निवतकर जिल्हाधिकारी असतील.

Web Title: Ranjitsinh Deol will replace Aswini Bhide in Mumbai Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.