Join us

Ramdev Baba vs NCP: "रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय..."; राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 14:51 IST

महिलांबद्दल रामदेव बाबानी केलेल्या विधानामुळे नवा वाद

Ramdev Baba vs NCP: योगगुरू बाबा रामदेव नेहमी आपल्या योगासनांमुळे किंवा पतंजली कंपनीबाबतच्या बातम्यांमुळे चर्चेत असतात. त्यासोबतच काही वेळा ते आपल्या वक्तव्यांमुळेही चर्चेचा विषय ठरतात. नुकतेच त्यांनी ठाण्यात महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एक वादग्रस्त निर्माण झाला आहे. पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले की, 'महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही(पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात.' विशेष म्हणजे, बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले, तेव्हा मंचावर त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदें उपस्थित होते. त्यामुळे रामदेव बाबांच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आंदोलन व घोषणाबाजीही करण्यात आली.

रामदेव बाबांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रसेच्या प्रदेश कार्यालयासमोर घोषणाबाजी व आंदोलन करण्यात आले. "रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय... रामदेवबाबा हाय हाय..." अशा घोषणा महिला वर्गाकडून देण्यात आल्या. तसेच उपस्थित इतर सर्वांनीही, "समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्‍या रामदेव बाबाचा निषेध असो... मुखी राम राम बोला... याला जोड्याने हाणा..." अशा जोरदार घोषणा देत त्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेव विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

त्यावेळीच अमृता फडणवीसांनी त्यांना कानाखाली मारायला हवी होती!

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी या वक्तव्याबाबत रामदेव बाबावर हल्लाबोल केला. "बाबा, शीर्षासन करा म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा नीट होईल... महिलांनी काय घालायचं, काय नाही, हा त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. अमृता फडणवीसांनी तेव्हाच बाबा रामदेव यांच्या कानाखाली मारायला हवी होती. महिलांनी साडी, सलवार घालणे ईथपर्यंत ठीक होतं पण पुढचं विधान कितपत योग्य याचा विचार करायला हवा. रामदेव बाबा डोकं खाली पाय वर करा म्हणजे तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल. बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही. रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फासू," असा इशाराच त्यांनी दिला.

टॅग्स :रामदेव बाबापतंजलीराष्ट्रवादी काँग्रेस