Join us  

“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 2:52 PM

Ramdas Athawale News: संपूर्ण देशभरात एनडीएला किती जागा मिळतील, याबाबतही मोठा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Ramdas Athawale News: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान झाले असून, आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ०४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यातच इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात मोठ्या प्रमाणात दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. यातच सत्ताधारी असो वा विरोधक लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार, याबाबतही दावे केले जात आहेत. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही याबाबत एक आकडा सांगितला आहे. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तरही दिले. 

नितीन गडकरींचा नागपूरात पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला होता. पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संजय राऊत साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत, त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे. परंतु, गैरसमज पसरवण्यासाठी संजय राऊत यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. भाजपा नेत्यांमध्ये गैरसमज निर्माण व्हावा, यासाठी लेखात तशी भूमिका मांडली आहे. नितीन गडकरी यांना पाडण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही सगळे नितीन गडकरी यांच्या पाठीशी होतो. प्रचाराला अनेक बडे नेते आले होते, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ७५ हून अधिक जागा मिळतील

४ जूनला मतमोजणी असून, निकाल येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ४०० पारचा नारा दिला होता. त्याबाबत आम्हाला विश्वास आहे. उत्तर भारतात भाजपा आणि एनडीए मजबूत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आमच्यासोबत राजभर यांचा पक्ष आहे. अनुप्रिया पटेल यांचा अपना दल आहे. निषाद पार्टी आहे. यांच्यासह अनेक जण आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ७५ हून अधिक जागा मिळतील, अशी आमची अपेक्षा आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात महायुतीला जोरदार टक्कर आहे. आम्हीही चांगली लढत दिली आहे. चांगले उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, मुंबईतील सर्व ६ जागा निवडून येतील. तर राज्यात ३६ ते ४० जागा निवडून येतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. देशात ३५० ते ४०० जागा निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४रामदास आठवलेमहायुतीराष्ट्रीय लोकशाही आघाडीमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४