"मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय आवश्यकता?"; रामदास आठवलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:37 IST2024-12-08T15:33:13+5:302024-12-08T15:37:52+5:30

राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्यावरुन रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ramdas Athawale has reacted to Raj Thackeray inclusion in the Mahayuti | "मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय आवश्यकता?"; रामदास आठवलेंचा सवाल

"मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय आवश्यकता?"; रामदास आठवलेंचा सवाल

Ramdas Athawale on Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागेवर यश मिळवता आलेलं नाही. राज ठाकरे यांच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच दिले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू असं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावरुन आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंनामहायुतीत घेण्याबाबत भाष्य केलं आहे.

मनसे आता महायुतीमध्ये येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर महायुतीमध्ये घेतलं जाईल अशी चर्चा  सुरु आहे असं पत्रकारांनी म्हटलं. त्यावर राज ठाकरेंना महायुतीत घेऊन फायदा नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटलं. रामदास आठवडे हे नाशिकमध्ये बोलत होते.

"मला वाटतं की राज ठाकरेंची जी हवा आहे ती या निवडणुकीत गेलेली आहे. राज ठाकरे १४३ जागा लढले. माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले. पण त्यांचे स्वप्न भंग झालेलं आहे. बाळासाहेब ठाकरे देखील म्हणायचे की माझ्या सभांना एवढी गर्दी होते तरी मतं मिळत नाहीत. छगन भुजबळ हे माझगावमधून निवडून यायचे पण बाळासाहेबांच्या सभांना प्रचंड गर्दी असायची. इंदिरा गांधींपेक्षा मोठ्या सभा त्यांच्या व्हायच्या. तशा राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात. पण लोक ऐकायला येतात आणि निघून जातात. ते काय मतं देण्यासाठी त्यांच्यासोबत राहत नाहीत. त्यांनी असा प्रयत्न केला आहे पण राज ठाकरे महायुतीमध्ये येतील असं मला वाटत नाही," असं रामदास आठवले म्हणाले.

"पुढे याबाबत काय निर्णय होणार आहे हे मला माहिती नाही. पण महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये अजिबात फायदा नाही. त्यांची हाड लाईन असल्यामुळे त्यांचा विशेष आपल्याला फायदा होणार नाही. मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे? त्यामुळे त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही त्यांना बरोबर घ्याल पण ते येतील की नाही माहिती नाही. महापालिकेच्या निवडणुकीत काय निर्णय होईल मला माहिती नाही. पण महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा फायदा होऊ शकतो. काही ठिकाणी त्यांचा थोडा उपयोग होऊ शकतो. काय निर्णय घ्यायचा तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील. माझं व्यक्तिगत मत आहे की, त्यांना सोबत घेतल्याने महायुतीचे नुकसानचं होणार आहे," असंही रामदास आठवले म्हणाले.

"शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपले रंग बदलले. त्यात भगवे, निळा, हिरवा रंग होते पण आता त्यांनी भगवा रंग हातात घेतला आहे. भगव्या रंगाचा अर्थ महान आहे. भाजपचा हिंदुत्वाचा नारा मुस्लिमविरोधी नाही. जे मुस्लिम पाकिस्तान देशाला बळ देता त्यांच्याविरोधी आम्ही आहोत. मुस्लिम आपले बांधवच आहेत. बतेंगे तो कटेगे असं योगिजी बोले होते. मात्र त्याचा अर्थ, मोदींना पाठिंबा देणाऱ्यांनी एकत्र यावे, असा होता," असं आठवलेंनी म्हटलं.

Web Title: Ramdas Athawale has reacted to Raj Thackeray inclusion in the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.