Join us

Ramdas Athawale: "ED स्वतंत्र विभाग, संजय राऊतांच्या तपासामागे भाजपाचा संबंध नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 16:00 IST

Ramdas Athawale: मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना (Sanjay Raut) ईडीकडून अटक करण्यात आली

मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून पीएमपीएलच्या न्यायालयाने राऊतांना 4 ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईचे पडसाद आज संसदेच्या अधिवेशनातही पाहायला मिळाले. खासदार जया बच्चन यांनीही ईडीच्या कारवाईवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांकडून ईडीच्या कारवाईविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, भाजप नेते या कारवाईचं समर्थन करताना दिसून येत आहेत. आता, भाजपचे सहकारी पक्ष असलेल्या केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही ED कारवाईचे समर्थन केलं आहे. तसेच, याचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलं.  

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना (Sanjay Raut) ईडीकडून अटक करण्यात आली. मॅरेथॉन चौकशीनंतर ईडीने संजय राऊतांना अटक केली. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर ईडीने राऊतांना अटक केली. यानंतर आता राऊत यांच्या अटकेवर विविध क्षेत्रातील लोकांनी प्रतिक्रिया दिली. त्यात, राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया देताना कारवाईचं समर्थन केलं आहे.  ईडी एक स्वतंत्र विभाग आहे. जर कुठे भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहारात अनियमितता आढळून आल्यास ईडीकडून तपास करण्यात येतो. या कारवाईमागे भाजपचा काहीही संबंध नाही, भाजपा कुणालाही त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही, असे मत रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाल्या जया बच्चन

राऊत यांच्या अटकेनंतर जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला. फक्त 11 लाख रुपयांसाठी त्रास दिला जात आहे असं म्हणत 2024 पर्यंत हे सर्व सुरू राहील, असं जया बच्चन यांनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणाला भाजपाच जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणावर दिग्दर्शक अशोक पंडित आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

अजित पवार काय म्हणाले

ही बातमी मला तुमच्याकडूनच समजली. मागच्या काळात ईडीच्या नोटीसा आल्या आहेत. ज्या संस्था आहेत, त्यांना स्वायत्ता आणि चौकशीचे अधिकार देण्यात आले आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये काही तक्रारी आल्या तर त्यांच्या प्रत्येक नागरिकाच्या बाबतीतले चौकशीचे अधिकार त्यांना आहेत. नक्की काय झालं आहे, त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा का येत आहेत, याबाबत अधिक स्पष्टपणे राऊतच सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. या यंत्रणांना देशातील कोणत्याही व्यक्तींची चौकशी करण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

टॅग्स :रामदास आठवलेअंमलबजावणी संचालनालयसंजय राऊत