Kangana Ranaut: 'स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगनाची औकात नाही', राजू शेट्टींचा सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 20:35 IST2021-11-11T20:34:32+5:302021-11-11T20:35:24+5:30
देशाला १९४७ साली भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्या अभिनेत्री कंगना रणौतवर आता जोरदार टीका केली जात आहे.

Kangana Ranaut: 'स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगनाची औकात नाही', राजू शेट्टींचा सणसणीत टोला
देशाला १९४७ साली भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्या अभिनेत्री कंगना रणौतवर आता जोरदार टीका केली जात आहे. स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगनाची औकात नाही, अशी रोखठोक टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
"व्यसनाधीन झालेल्या नटनट्यांनी काहीतरी वक्तव्य करायचं आणि माध्यमांनी त्याला प्रसिद्धी द्यायची हे आपलं दुर्दैव आहे. स्वातंत्र्यासारख्या पवित्र गोष्टीबद्दल बोलण्याची आपली औकात आहे का हे आधी कंगनानं बघावं मग बोलावं. कारण देशात भगतसिंग यांच्यापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशाला स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर एकत्र केला होता. या गोष्टीला तर कुणीतरी नटी भीक म्हणत असेल तर खरंतर अशा बातम्या दाखवणंच चुकीचं आहे. हा स्वातंत्र्याचा नव्हे, देशाचा अपमान आहे", असा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे कंगनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. यानंतर कंगनावर टीकेची झोड उठत आहे. यातच आता कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही अशीच मागणी केली आहे.
कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी कंगना राणावत यांचा आपल्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कला क्षेत्र वगळता कंगना रणौत या प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी आपले नाक खुपसून प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करत असतात. याच कारणाने प्रसिद्ध सोशल मीडिया ट्विटरने कंगना रणौत यांचे अकाऊंट बंद केले होते, असे राष्ट्रवादी युथ काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.