Join us

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी पुन्हा राजेश क्षीरसागर, पदाचीही केली वाटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:04 IST

मुंबई : नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद ...

मुंबई : नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना राज्य शासनाने केली आहे. या संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात "उपाध्यक्ष" पदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती करण्यात आली."मित्र" संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार अशी पदरचना यापूर्वी करण्यात आली आहे. गुरुवारी "मित्र" संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात "उपाध्यक्ष"पदी क्षीरसागर यांची फेरनियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदांची संख्या वाढवून आमदार दिलीप वळसे-पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचीही नियुक्ती या पदावर झाली. त्यामुळे या पदाच्याही राजकीय सोयीसाठी तीन पक्षांच्या आमदारांना संधी देऊन वाटण्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्रमुख शहरांचा विकास करण्याची योजना सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर शहराचा समावेश करण्यात आला आहे. सौरऊर्जा प्रकल्प आदी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. राज्याच्या जलद व सर्वसमावेशक विकासाचा भाग होणे ही मोठी संधी आहे. नियोजन विभागाच्या कामकाजाशी संलग्न अशी मित्र या संस्थेची कार्यपद्धती असल्याने कार्यक्षमता सिद्ध करण्याची पुन्हा संधी मिळाल्याची भावना क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :कोल्हापूरराजेश विनायकराव क्षीरसागर