राजे रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारच्या ताब्यात; १८ ऑगस्टला तलवारीसह मंत्री शेलार मुंबईत दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 09:47 IST2025-08-12T09:47:40+5:302025-08-12T09:47:54+5:30

परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळविण्याची ही पहिलीच वेळ

Raje Raghuji Bhosale sword is in the possession of the state government Minister Shelar will arrive in Mumbai with the sword on August 18 | राजे रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारच्या ताब्यात; १८ ऑगस्टला तलवारीसह मंत्री शेलार मुंबईत दाखल होणार

राजे रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारच्या ताब्यात; १८ ऑगस्टला तलवारीसह मंत्री शेलार मुंबईत दाखल होणार

मुंबई : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार राजे रघुजी भोसले यांची लिलावात ब्रिटनला गेलेली तलवार महाराष्ट्र सरकारने परत मिळविली आहे. लंडन येथे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ती आज ताब्यात घेतली. १८ ऑगस्टला ती मुंबईत दाखल होईल. तलवार लिलावात निघाल्यानंतर ती राज्य सरकारने घ्यावी, यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचा निर्णय घेतला.

मंत्री शेलार यांनी केला स्वीकार: अॅड. आशिष शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करून या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. शेलार यांनी ही तलवार सोमवारी ताब्यात घेतली. अशा प्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी लंडनमधील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ही घटनेचा जल्लोष केला. पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी हे शेलार यांच्यासोबत होते.

कशी आहे तलवार ? 

रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या 'फिरंग' पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. 

तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गामध्ये प्रसिद्ध होती. पात्याच्या पाठीवर तळाशी 'श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग' हा देवनागरी उल्लेख सोन्याच्या पाण्याने केलेला आहे.

मराठी साम्राज्याचा विस्तार

१८ ऑगस्टला मुंबई विमानतळापासून बाइक रॅली काढून वाजतगाजत ही तलवार दादरच्या पु.ल. देशपांडे कला अकदमीमध्ये आणण्यात येणार आहे. राजे रघुजी भोसले प्रथम यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. याचबरोबर, रघुजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगड, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूल नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला दबदबा निर्माण केला.

Web Title: Raje Raghuji Bhosale sword is in the possession of the state government Minister Shelar will arrive in Mumbai with the sword on August 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.