Join us  

लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 3:26 PM

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे.

मुंबई:  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता 'देश हाच देव' मानून यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्यसेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. मंडळानं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक केले आहे.

उद्धव ठाकरे ट्विट करत म्हणाले की, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

सध्या राज्य कोरोनाच्या विळख्यात आहे. त्यातच गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. लालबागच्या राजाला दरवर्षी मोठी गर्दी होते. लाखो भाविक राजाच्या दर्शनाला येतात. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मंडळानं गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आरोग्यसेवा करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. लालबागच्या राजाला ८६ वर्षांची परंपरा आहे. 

असा होणार लालबागच्या राजाचा उत्सव-

  • गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार नाही. मात्र, भविष्यात तीच मूर्ती कायम राहणार
  • ११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे उपक्रम राबवणार..
  • कोरोनालढ्यात शहिद झालेल्या पोलिस पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान
  • मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये देणार
  • गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान

टॅग्स :उद्धव ठाकरेलालबागचा राजामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यागणेशोत्सवमुंबईमहाराष्ट्र सरकार