मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेसाठी एकाच मंचावर एकत्र आले. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"बऱ्याच वर्षांनी दोघांची भेट व्यासपीठावर झाली आहे. आज आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की आमच्या दोघांमधला जो अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली आणि करणारच. म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे."
"भाजपा ही अफवांची फॅक्ट्री आहे. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट, कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय. ९२-९३ मध्ये जे काही घडलं तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांनाही हिंदू म्हणून शिवसैनिकांनी मराठी माणसानं वाचवलं. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
"जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं"
राज ठाकरे यांनी देखील फडणवीसांवर निशाणा साधला आहे. "आज मोर्चा निघायला पाहिजे होता... मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो, याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता. पण पाऊस आहे. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा. आज २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत... जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.