महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. संजय राऊत, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या चर्चेत दोन्ही बंधुंनी सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "मुंबई तोडण्याचा आणि येथील संपत्ती गुजरातला पळवण्याचा कट रचला जात असून, राज्यातील सध्याचे मुख्यमंत्री केवळ 'दिल्लीचे आदेश' पाळणारे बाहुले आहेत," अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे. या चर्चेत ईव्हीएमच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी तेलंगणा आणि पंजाबमधील जिल्हा परिषद निवडणुकांचा दाखला दिला. ते म्हणाले की, "जेव्हा मतदान बॅलेट पेपरवर झाले, तेव्हा भाजप सातव्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. ईव्हीएम आणि मोदींची जादू नसेल, तर भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळेल."
आता तेलंगणा आणि पंजाबमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. तिथे मतदान बॅलेट पेपरवर झालं. तेलंगणात भारतीय जनता पक्ष सातव्या नंबरवर गेला आणि पंजाबमध्ये चार नंबरवर गेला. हे बॅलेट पेपरवर सिद्ध झालंच ना. कर्नाटकातही तेच झाले. बॅलेट पेपरवर निकाल भाजपच्या बाजूने लागत नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. लहानपणी आपण सगळे पत्त्यांचा बंगला करायचो.. यांच्याकडेसुद्धा बघितलं तर पत्त्यांचा बंगला आहे पण तो उलटा आहे. खालचा पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे आणि आता हे जे सगळे बोलताहेत ते केवळ नरेंद्र मोदींच्या जिवावर बोलताहेत. भारतीय जनता पक्षाला आज जे काही मतदान होतंय ते फक्त नरेंद्र मोदींच्याच नावावर होतंय. यांच्या कोणाच्याही नावावर होत नाही, असे राज म्हणाले.
विमानतळ अदानींच्या घशात घालण्याचा 'प्लॅन'राज ठाकरे यांनी मुंबईतील विमानतळाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला. त्या दिवशी माझ्या एका भाषणात मी असं म्हटलं होतं की, मुंबईनंतर नवी मुंबईत जे विमानतळ झालंय, मुंबईतल्या हक्काच्या विमानतळावरील सगळा कार्गो तिथे नवी मुंबईतल्या विमानतळावर हलवतील. आता सुरुवात झालेलीच आहे, पुढे हळूहळू मुंबईतील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईत हलवणार. आताचं मुंबईतलं विमानतळ अदानीकडे आहेच. आताच्या विमानतळाचं क्षेत्रफळ तुम्ही पाहिलंत तर त्यात कमीत कमी ५० शिवाजी पार्क मैदाने बसतील इतकं ते मोठं आहे. म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक, इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईला हलवायचं आणि इथल्या विमानतळाचा सगळा भाग विकायला काढायचा हाच त्यांचा प्लॅन आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. मोदी ज्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळी अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर अदानीला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. मला नेहमी एक प्रश्न पडतो. भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचाय की, समजा तिथे भारतीय जनता पक्षाऐवजी काँग्रेसचे सरकार किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचं सरकार असतं आणि एखाद्या केंद्रात बसलेल्या सरकारने काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने जर एकाच उद्योगपतीवर मेहरबानी केली असती, तर भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे रिअॅक्ट झाला असता? मग आज हे होताना भारतीय जनता पक्षाचे लोक हवालदिल का आहेत? गप्प का आहेत? याचं कारण त्यांच्या हातात काहीच नाही. ही सगळी मोदींनी बसवलेली माणसं आहेत. कळलं का? याच्यातले जे स्वकर्तृत्वाने बसलेले होते त्यांना नष्ट केले गेले. उदाहरणार्थ शिवराजसिंग चौहान असतील, गडकरी असतील. आणखी एक-दोन जण आहेत. ही माणसं यांना आवडत नाहीत. पूर्वी काँग्रेसच्या काळात जे व्हायचं तेच आता सुरू आहे. फक्त यांचा उद्देश सफल झाला पाहिजे. बस्स! पण एक सांगतो काँग्रेसच्या काळात जे पंतप्रधान होते त्यांना कुठल्या राज्याचं लेबल नव्हतं. हे पहिल्यांदा असे राज्यकर्ते बसले आहेत ज्यांच्यावर कुठल्यातरी राज्याचं लेबल आहे.
"मुंबईची संस्कृती मारली जातेय" - उद्धव ठाकरेया चर्चेत उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा मांडला. "मुंबई महाराष्ट्रापासून भौगोलिकरीत्या कोणीही तोडू शकणार नाही, पण येथील मराठी संस्कृती आणि अस्मिता पद्धतशीरपणे मारली जात आहे. मुंबईवर हिंदीची सक्ती केली जात असून, मराठी माणसाला हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीसांच्या 'गर्जना' केवळ दिखावा?संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या "मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही" या विधानाचा संदर्भ दिला असता, राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, "त्यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीतून (मोदी-शहा) जो आदेश येईल, त्यावर केवळ सही करणे एवढेच काम येथील राज्यकर्त्यांचे आहे. 'ओबे द ऑर्डर' हेच सध्याच्या सरकारचे ब्रीदवाक्य आहे."
Web Summary : Raj Thackeray criticized BJP, alleging EVM manipulation led to poor results in Telangana and Punjab where ballot papers were used. He accused BJP of prioritizing Gujarati interests over Maharashtra, and raised concerns about Mumbai airport's privatization.
Web Summary : राज ठाकरे ने भाजपा पर हमला बोलते हुए आरोप लगाया कि ईवीएम में हेरफेर से तेलंगाना और पंजाब में खराब परिणाम आए, जहां मतपत्रों का उपयोग किया गया था। उन्होंने भाजपा पर महाराष्ट्र से अधिक गुजराती हितों को प्राथमिकता देने का आरोप लगाया और मुंबई हवाई अड्डे के निजीकरण पर चिंता जताई।