Join us  

'राज ठाकरेंच्या बोलण्याला अर्थ आहे, राष्ट्रवादीनेच जातीपातीचं राजकारण केलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 4:31 PM

आता भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राज ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. 

ठळक मुद्देराज ठाकरे यांच्या भूमिकेला, बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पाहिलं तर कुणी जातीपातीचं राजकारण केलं ते सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे.

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला असं मत मांडलं होतं. (Raj Thackeray Vs Sharad Pawar: ) राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार वाद पेटला आहे. राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता. आता, या वादात भाजपानेही उडी घेतली असून राज ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. 

शरद पवार यानी राज ठाकरेंना प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर, राज ठाकरेंनी थेट प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार ट्विट करत शरद पवारांना पुन्हा एकदा डिवचले आहे. त्यानंतर, आता भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राज ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, मनसेच्या पहिल्या 13 आमदारांमध्ये प्रवीण दरेकर यांचाही समावेश होता, तेव्हा ते राज ठाकरेंचे शिलेदार होते. आज त्यांनी राज ठाकरेंच्या विधानाचे समर्थन केले आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेला, बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पाहिल्यास, राष्ट्रवादीच काँग्रेसनेच सर्वाधिक जातीपातीचं राजकारण केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे मला असं वाटत नाही. अशाप्रकारे जातीयवाद फोफावण्याचं काम राष्ट्रवादीनेच केलं, असे म्हणत दरेकर यांनी राज ठाकरेंची री ओढली. त्यामुळे, आता जातीपातीचा हा राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.  

राज ठाकरेंनी ट्विट करुन शेअर केले प्रबोधनकारांचे विचार

राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा या पुस्तकातील विचार ट्विट केले आहेत. "जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही... जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!" हे विचार राज ठाकरे यांनी शेअर केले आहेत. त्यामुळे आता यावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :राज ठाकरेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाप्रवीण दरेकरमराठा