Join us

दुष्काळ आणि बेरोजगारीकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 13:16 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मीडियाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, सर्वप्रथम तमाम मराठीजनांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. अगदी परवाच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतील महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. गेले काही आठवडे एकूणच वातावरण निवडणूकमय झालेले असल्यामुळे सर्वांचेच अगदी माध्यमांचे देखील दोन गंभीर विषयांकडे दुर्लक्ष झालं आहे. दुष्काळ आणि बेरोजगारीकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचं राज ठाकरेंनी अधोरेखित केलं आहे.  पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्राला या दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती प्रचंड गंभीर आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, तर यावेळेचा दुष्काळ हा 1972च्या दुष्काळापेक्षा गंभीर आहे. एका बाजूस दुष्काळामुळे गावच्या गावं ओस पडली आहेत आणि तिथल्या लोकांचे तांडे उपजीविकेच्या शोधात येत आहेत. तर दुसरीकडे शहरांमध्ये फक्त असंघटित नाही तर अगदी उच्च कौशल्याधारित व्यवसायातील तरुण-तरुणी देखील त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. अनेक सरकारी आस्थापनांमध्येच पगार वेळेवर होत नसतील तर खासगी उद्योगांमध्ये काय अवस्था असेल?या दोन्ही विषयात आता सरकारनं त्यांच्या कामगिरीचे पोकळ दावे करण्याच्या पलीकडे जायला हवं आणि माध्यमांनी देखील काटेकोरपणे या दाव्यातील तथ्यं तपासायला हवीत. निवडणुका येतील, जातील, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला या विषयांकडे बघायला हवं. सर्वच क्षेत्रात अग्रणी असलेलं राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक आहे, पण आपण वेळेत जागे झालो नाही तर हा लौकिक हातातून निसटू शकतो. दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेवून आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत. तिथे तिथे मनसे दणका देत आहेत. पण हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की तमाम मराठीजनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा आणि त्यासाठी महाराष्ट्र दिन  याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, की दुर्लक्ष करू नका, गाफील राहू नका.  

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदी