Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फेकलेले' आकडे पाहून लक्ष्मीही थक्क, राज ठाकरेंचा मोदी-फडणवीस-गडकरींवर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 10:02 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जोरदार टीकास्त्र सोडले आहे.  

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. जनतेला देण्यात येणाऱ्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणारे व्यंगचित्र त्यांनी रेखाटले आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं आणखी एक व्यंगचित्र साकारत त्यांनी या तिघांवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या फोटोंसमोर लक्ष्मी उभी आहे. या तिघांच्या फोटोंना पाहून लक्ष्मी म्हणतेय की,'बाबांनो गेल्या साडेचार वर्षात जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे'. अशा पद्धतीनं राज ठाकरेंनी या तिघांवर तिखट शब्दांत टीका केली आहे.

(साहेब,अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय!; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा)

दरम्यान, नरक चतुर्दशीच्या दिवशीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर व्यंगचित्राद्वारे टीकास्त्र सोडले होते. या चित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या परंपरेप्रमाणे आंघोळीच्या आधी अंगाला तेल लावून घेत असल्याचे दाखवण्यात आले होते. याचदरम्यान,एक जण येऊन त्यांच्या कानामध्ये बोलतो की,  साहेब... अख्खा महाराष्ट्र तुम्हाला 'धुवायला' आलाय, पाठवू का?. तर दुसरीकडे, चित्रात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली दाखवण्यात आली आहे. एकूणच, राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.

तर दुसऱ्या चित्रात, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न असून, अमित शहा हे नरकासूर असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात अमित शहा यांना नरकासुराच्या स्वरुपात दाखवलं. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा करण्यात येतो. नरक चतुर्दशीच्या या दिवासाची सुरुवात आंघोळ केल्यानंतर कारेटं पायाखाली एका फोडले जाते. त्याच कारेटे म्हणून अमित शहा यांना दाखवण्यात आले. भाजपा पार्टी झोपलेली असून, अमित शहारुपी नरकासुराला चिरडण्याचे स्वप्न पाहत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले.  

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदीनितीन गडकरीदेवेंद्र फडणवीस