राजमुद्रेचा ध्वज निवडणूक काळात वापरणार नाही - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 11:10 IST2020-01-24T07:07:23+5:302020-01-24T11:10:31+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर गुरुवारी आपला ध्वज बदलला.

राजमुद्रेचा ध्वज निवडणूक काळात वापरणार नाही - राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर गुरुवारी आपला ध्वज बदलला. पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय एकदिवसीय अधिवेशनात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भगव्या रंगाच्या चौकोनी ध्वजाचे अनावरण केले. या भगव्या ध्वजाच्या मध्यभागी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा आहे.
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर सकाळी राज यांच्या हस्ते ध्वजाचे अनावरण करण्यात आले.
ध्वजाचे अनावरण करताना, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो. माझे भाषण संध्याकाळी होणार आहे. मनसेचे पहिले अधिवेशन आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. सर्वांचे मन:पूर्वक स्वागत करतो. गेले काही दिवस ज्या गोष्टींची चर्चा सुरू होती, तो पक्षाचा नवा ध्वज मी आपल्यासमोर सादर करतो, धन्यवाद!’ इतके आटोपशीर वक्तव्य राज यांनी केले. राज ठाकरे यांच्या हस्ते नव्या ध्वजाचे अनावरण होताच कार्यक्रमस्थळी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष झाला. यानंतर व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.
सायंकाळी मात्र राज यांनी सविस्तरपणे आपली भूमिका विशद केली. राजमुद्रा असलेल्या ध्वजाचा पूर्ण मान, प्रतिष्ठा राखण्याची ताकीद त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. राजमुद्रा असेलला ध्वज निवडणुकीच्या काळात वापरला जाणार नाही. निवडणुकांच्या काळात इंजीन हे पक्षाचे चिन्ह छापलेले भगवे ध्वज वापरण्यात येतील, असे राज यांनी स्पष्ट केले. त्यामुळे झेंड्यावरून मनसेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नच त्यांनी हाणून पाडला. स्थापनेनंतर तब्बल १४ वर्षांनी मनसचा ध्वज व भूमिकेत पूर्ण बदल झाला आहे. मनसेच्या जुन्या झेंड्यात चार रंग होते. झेंड्याच्या मध्यभागी अधिक प्रमाणात भगवा, तर वरच्या बाजूला निळा आणि खालच्या बाजूस हिरवा रंग होता.