Join us

राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांसोबत मंथन, बैठकीत काय सूचना दिल्या?; नांदगावकरांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 09:03 IST

राज ठाकरेंकडून आगामी काळात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे.

MNS Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मनसेकडून यंदा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांच्या आयोजनाविषयी राज यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसंच आगामी काळात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे. याबाबतही पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज यांनी चर्चा केली.

बैठकीविषयी माहिती देताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, "वरळी येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आचारसंहितेबाबत आणि पक्षसंघटनेत केल्या जाणाऱ्या बदलांवर भाष्य केलं होतं. ही आचारसंहिता कशी असली पाहिजे, यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसंच यंदाचा मराठी भाषा गौरव दिन मनसेकडून धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्याच्या आयोजनाविषयीही चर्चा झाली," असं नांदगावकर यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठीच्या हितासाठी राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं, अशा आशयाचे पोस्टर्स काही दिवसांपूर्वी दादर इथं पाहायला मिळाले होते. त्याबाबत प्रश्न विचारला असता आता त्यावर बोलणं उचित नाही, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला असला तरी भाषेचं संवर्धन होऊन ही भाषा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीतील साहित्य लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, हा दृष्टीकोन ठेवून मनसेकडून २७ फेब्रुवारी ते २ दोन मार्च या कालावधीत शिवाजी पार्क इथं अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे.

आचारसंहिता बनवण्यासाठी राज ठाकरेंनी कसली कंबर

वरळी येथील मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतःच पक्षाची आचारसंहिता बनवत आहेत. पक्ष स्थापनेवेळी नाव आणि झेंडा कोणता असेल, हा निर्णय त्यांनी घेतला. आताही पक्षात कोणती पदे असतील, त्याची पुनर्रचना कशी असेल, आचारसंहितेत कोणते मुद्दे असावेत, याचा अभ्यास करून आराखडा तयार करत आहेत. यामुळे निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना पक्षात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. ९ मार्चला वर्धापनदिनी मेळाव्यातून पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे, अशी माहिती आहे.

टॅग्स :मनसेराज ठाकरेबाळा नांदगावकर