Join us

"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:01 IST

Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijay Sabha: हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द करायला लावल्यानंतर आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला मुंबईत सुरुवात झाली असून, या मेळाव्यामध्ये सुरुवातीचं भाषण राज ठाकरे यांनी केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास ठाकरी शैलीमध्ये जोरदार टोला लगावला आहे.

हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द करायला लावल्यानंतर आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला मुंबईत सुरुवात झाली असून, या मेळाव्यामध्ये सुरुवातीचं भाषण राज ठाकरे यांनी केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास ठाकरी शैलीमध्ये जोरदार टोला लगावला आहे. जे बाळासाहेबांना जमलं नाही, इतरांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, असे राज ठाकरे म्हणाले.

वरळीत एनएससीआय डोम येथे सुरू असलेल्या या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाषण करताना राज ठाकरे यांनी या विजयी सभेतून जोरदार टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो, याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे. आज २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत... जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं विधान राज ठाकरे यांनी या सभेच्या निमित्ताने झालेल्या ठाकरे बंधूंच्या ऐक्यावरून केलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, इथे चॅनल्सचे कॅमेरे लागलेले आहेत. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कुणी कमी हसलं का, कुणी कमी हसलं का, कुणी बोलताहेत का. आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच अनेकांना रस असतो, असा टोललाही राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.

या सभेसाठी कुठलाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा, असं ठरलं होतं. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही. खरं तर सध्या हिंदीवरून निर्माण झालेला हा प्रश्नच अनाठायी होता. महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती लादण्याची काही गरज नव्हती. कशासाठी आणि कुणासाठी तुम्ही लहान मुलांवर हिंदी भाषेची सक्ती करताय. कुणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ज्ञांना विचारायचं नाही. आमच्याकडे सत्ता आहे आम्ही लादणार हे यांचं धोरण होतं. पण तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात. इथे आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर आहे, असं सूचक विधान राज ठाकरे यांनी केलं.

टॅग्स :मराठीमहाराष्ट्रराज ठाकरेउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस