Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 08:25 IST

राजकारणामुळे एकेकाळी दुरावलेले हे भाऊ आता पुन्हा एकत्र दिसणार असल्याने, ते काही राजकीय संदेश देतील का, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

तब्बल वीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. वरळी येथील विजय मेळाव्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत. सत्तेच्या राजकारणामुळे एकेकाळी दुरावलेले हे भाऊ आता पुन्हा एकत्र दिसणार असल्याने त्यांची 'केमिस्ट्री' कशी असेल आणि ते काही राजकीय संदेश देतील का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठी अस्मितेचा मुद्दा ठरला निमित्त!उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यामागे मराठी भाषेवरील प्रेम हेच प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा धोरणाबाबत एक आदेश जारी केला होता, ज्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला. या आदेशाला दोन्ही ठाकरे बंधूंनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या विरोधामुळे सरकारने आपल्या आदेशावर 'यू-टर्न' घेतला आणि हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केला. सरकारच्या या निर्णयाला आपला आणि मराठी भाषेचा विजय मानत आज हा 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे.

ठाकरे बंधू शेवटचे कधी एकत्र दिसले होते?यापूर्वी, २००५ मध्ये उद्धव आणि राज ठाकरे शेवटचे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अविभाजित शिवसेना सोडल्यानंतर मालवण विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोघेही उपस्थित होते. त्याच वर्षी राज ठाकरे यांनीही २७ नोव्हेंबर २००५ रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर २००६मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाची स्थापना केली.

विजय मेळावा कुठे होणार?ठाकरे बंधूंचा हा 'विजयी मेळावा' वरळीतील एनएससीआय डोम येथे सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला गेला आहे, तो परिसर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो.

कोणताही 'झेंडा' नाही!

शिवसेना 'उबाठा' गटाचे नेते अरविंद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅलीत ५० हजार ते १ लाख लोक एकत्र येतील, अशी शक्यता आहे. ठाकरे बंधू मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येत असले तरी, येत्या निवडणुकीत ते एकत्र राहतील का, हा निर्णय दोन्ही भावांवर अवलंबून आहे, असेही सावंत यांनी नमूद केले. या कार्यक्रमादरम्यान शिवसेना (उबाठा) आणि मनसे या दोन्ही पक्षांनी कोणतेही पक्षीय झेंडे, बॅनर, निवडणूक चिन्ह, होर्डिंग्ज वापरायचे नाहीत, असे ठरवले आहे.

टॅग्स :मराठीराज ठाकरेउद्धव ठाकरेवरळी