Raj Thackeray ( Marathi News ) : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे २० वर्षानंतर आज पहिल्यांदाच एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. हिंदी सक्तीला मुद्द्याविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध केला होता, यानंतर राज्य सरकारने जीआर रद्द केला. दरम्यान, हिंदी सक्तीला विरोध केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकली हा मुद्दा उपस्थित केला. अनेकदा ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात हा मुद्दा उपस्थित केला जातो. या टीकेला आज राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
राज ठाकरे म्हणाले, आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियायममध्ये शिकली. होय, मग यांना मराठीचा पुळका कसा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्यावर. कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे?
"...इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’
वरळीत एनएससीआय डोम येथे सुरू असलेल्या या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाषण करताना राज ठाकरे यांनी या विजयी सभेतून जोरदार टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो, याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे. आज २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत... जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं विधान राज ठाकरे यांनी या सभेच्या निमित्ताने झालेल्या ठाकरे बंधूंच्या ऐक्यावरून केलं.