Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात'; भाजप नेत्याने डिवचलं, मनसेनेही दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 19:52 IST

राज ठाकरे यांनी गंग नदीच्या पाण्याबद्दल केलेल्या विधानानंतर भाजपचे नेते तोंडसुख घेताना दिसत आहेत. आता भाजपचे उपाध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला. 

'राज ठाकरे काय बोलतात त्यांच्या लक्षात राहत नाहीत. मनसैनिकांना काहीतरी करायला सांगतात, पण ते वेगळं काय करतात. मला वाटतं ते सकाळी उठल्यावर भांग घेतात', अशा शब्दात भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी गंगा नदीच्या प्रदूषणावरून टीका केल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच आता कृपाशंकर सिंह यांनीही उडी घेतली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कृपाशंकर सिंह म्हणाले, "राज ठाकरे काही बोलले तर समजेल की त्यांना वेड लागलंय. त्याला कधी कळलंच नाही की आज काय बोलले आणि उद्या काय बोलले. मला वाटतं राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात. भांग घेऊन मस्त राहतात. संध्याकाळी ये माझ्या बांधवानो. माझ्या मनसैनिकांनो काहीतरी करा आणि ते काय वेगळं करतात समजत नाही. त्यांना पण भांग पाठवतो", अशा शब्दात भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरे यांना डिवचले. 

'तुमची लायकी नाहीये', मनसेचे उत्तर 

कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या टीकेला मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उत्तर दिले. "तुमची लायकी नाहीये, राज ठाकरेंवर टीका करण्याची. जो कोणी राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका करेल, त्याच्या कानाखाली आवाज निघेल. महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही", असा इशारा खोपकर यांनी दिला. 

कृपाशंकर सिंह एक फेरीवाला -खोपकर

"कृपाशंकर सिंहला इशारा देण्याइतका तो काही मोठा राजकारणी नाहीये. त्याची पात्रता नाहीये. राज ठाकरे म्हणतात, तसं कृपाशंकर सिंह हा एक फेरीवाला आहे. आज या पक्षात, तर उद्या त्या पक्षात", अशा शब्दात खोपकर यांनी कृपाशंकर सिंह यांना उत्तर दिले.  

गुणरत्न सदावर्तेंवरही टीका

अमेय खोपकर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "कोण आहे गुणरत्न सदावर्ते? ते कर्जतवरून बोलताहेत की, कसाऱ्यावरून? त्यांच्यामागे बुजगावणं उभं असतं. ही यांची पात्रता. यांची लायकी काय आहे? महाराष्ट्रासाठी यांनी काय केलंय? कशासाठी राजकारण करत आहेत", असे खोपकर म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेभाजपाराजकारणमनसे