राज ठाकरेंचा इंधन दरवाढीवरून 'भडका', मोदींना लगावला 'फटका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 14:12 IST2018-04-04T13:53:41+5:302018-04-04T14:12:46+5:30
मोदींच्या 'अच्छे दिन'ची खिल्ली; इंधन दरवाढीवरुन राज ठाकरे 'पेटले'

राज ठाकरेंचा इंधन दरवाढीवरून 'भडका', मोदींना लगावला 'फटका'
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून इंधन दरवाढीवर भाष्य केले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झालेल्या असतानाही मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेची लूट होत असल्याचे राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रातून दाखवले आहे.
राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रात पेट्रोल पंपवरील दृश्य रेखाटले आहे. या पेट्रोल पंपवर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा उभे आहेत. हे दोघे पेट्रोल पंपवर आलेल्या एका गाडीतील दोघांना धमकावत असल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून दाखवले आहे. 'हँड्स अप! निकाल पैसा !', असे शब्ददेखील राज यांनी मोदींच्या तोंडी दिले आहेत. एखाद्या सराईत गुंडाने रस्त्यात अडवून एखाद्या व्यक्तीची लूट करावी, तशा प्रकारचे चित्र राज ठाकरेंनी रेखाटले आहे. यासोबतच 'बाबांनो, हेच ते अच्छे दिन !', असेदेखील राज ठाकरेंनी या व्यंगचित्रात लिहिले आहे.
राज ठाकरेंनी या व्यंगचित्रात आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतींचाही उल्लेख केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती खाली घसरल्या असतानासुद्धा भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे, अशी ओळ राज ठाकरेंनी व्यंगचित्रात लिहिली आहे. मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेची दररोज लूट सुरु असल्याचे राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून दाखवले आहे.