Join us  

Raj Thackeray: मनसैनिकांच्या धरपकडीबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले, कारवाईची खिल्ली उडवत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 2:05 PM

Raj Thackeray News: मनसेचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने पोलिसांमार्फत केलेल्या धरपडकीच्या कारवाईची हे लोक कुठल्या जमान्यात वावरत आहेत हे कळत नाही, असं म्हणत,राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली.

मुंबई - मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेने आजपासून राज्यात भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा वाजवत आंदोलनाला सुरुवात केली आहे. दरम्यान, हा विषय एका दिवसात संपणारा नाही, तर ज्या ज्या ठिकाणी लाऊड स्पीकर लागतील, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान, आज होणारे मनसेचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने पोलिसांमार्फत केलेल्या धरपडकीच्या कारवाईची हे लोक कुठल्या जमान्यात वावरत आहेत हे कळत नाही, असं म्हणत,राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली.

मनसेच्या कार्यकर्त्यांच्या धरपकडीवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, पोलिसांकडून आमच्या लोकांची धरपकड केली जात आहे. पण कशासाठी. कशासाठी धरपकड करताय. हे मला कळत नाही. मोबाईलच्या काळात, कम्युनिकेशनची साधने उपलब्ध असताना तुम्ही माणसं पकडून काय होणार आहे. तुमच्या हाती काय लागणार आहे. हे अजून ६०-७०च्या दशकात वावरत आहेत का? असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, राज ठाकरेचं भाषण सुरू झालं की तिकडची वीज बंद करायची असले प्रकार केले जातात. पण आता वीज बंद करून काय होणार? आता मोबाईलवर सहज भाषण दिसतं. इतका मुर्खपणा, कुठल्या काळात जगताहेत हे मला कळत नाही. मला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की, हा विषय एका दिवसात संपणारा नाही. मनसैनिकांना आणि महाराष्ट्रातील हिंदू बांधवांना हेच सांगायचं आहे की, ज्या ज्या मशिदीमधील मौलवी ऐकणार नाहीत, जिथे लाऊड स्पीकर लागतील तिथे हनुमान चालिसा ही दुप्पट आवाजात लावली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, "मशिदीवरील भोंग्यांवरुन दिली जाणारी अजान हा काय केवळ पहाटेच्या अजानचा प्रश्न नाही. दिवसभरातील विविध वेळांना बांग दिली जाते. याचा लोकांना त्रास होतो. हा त्रास कमी व्हायला हवा हीच अपेक्षा आहे. विषय काही फक्त मशिदींवरचा नाही. मंदिरांवरही अनधिकृत भोंगे असतील आणि त्याचा लोकांना त्रास होतील तर तेही उतरवले गेले पाहिजेत. विशिष्ट डेसिबलची मर्यादा पाळण्याचं आवाहन करत तुम्ही परवानगी देत आहात. मग काय पोलिसांनी रोज मशिदींबाहेर डेसिबल मोजत बसायचे का? एवढंच काम त्यांना आहे का? त्यामुळे मशिदीवरील भोंगे कायमस्वरुपी उतरवले गेले पाहिजेत. तसं नाही झालं तर आमची लोकं हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणारच", असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेपोलिसमहाराष्ट्र सरकार