Join us  

Raj Thackeray : 'चलो ईडी कार्यालय'; 'खळ्ळ-खटॅक'वाल्या मनसेचा २२ ऑगस्टला 'शांती मोर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:48 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन 22 ऑगस्ट रोजीची आपली भूमिका स्पष्ट केली.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीकडून आलेल्या नोटीशीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्ट रोजी मनसेचे कार्यकर्ते ईडी कार्यालकडे जाणार आहेत. राज ठाकरेंच्या समर्थनार्थ त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रासह देशातील सर्वच कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा होतील. मात्र, सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, याची काळजीही आम्ही घेणार आहोत. त्यासाठी, शांततेच्या मार्गानं आम्ही ईडी कार्यालायबाहेर जाऊ, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यामुळे ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. परंतु, आता मनसेनं ठाणे बंदचं आवाहन मागे घेतलं आहे. मनसे अध्यक्ष राज यांनी लोकांना त्रास होईल असे काही करू नका, असे सांगितल्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आम्ही बंद पाठी घेत आहोत. त्यांना चौकशीची नोटीस पाठविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता आणि त्या तीव्र भावनेने आम्ही सरकार विरोधी ठाणे बंदचा इशारा दिला होता. पण त्या दिवशी आम्ही काय करणार आहोत याचा निर्णय आदल्या दिवशी घेतला जाईल. तूर्तास, आम्ही बंद मागे घेत आहोत, असे अविनाश जाधव यांनी लोकमतला सांगितले होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन 22 ऑगस्ट रोजीची आपली भूमिका स्पष्ट केली. आंदोलन हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे हेही आमचं एकप्रकारे आंदोलनच आहे. आमचं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने असेल, पोलिसांनाही आमच्याशी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.   

मनसेच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे : -

राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका जनतेच्या हिताची होती. ती भाजपाविरोधी असल्याने त्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवण्यात आलीय. त्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते २२ ऑगस्टला शांततेत आंदोलन करतील. मुंबईतील नागरिकांना ईडी कार्यालयाकडे यायचं असेल तर त्यांनीही सहभागी व्हावं.

कायदा-सुव्यवस्थेला त्रास होता कामा नये, असे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आलेत. त्याची दक्षता पक्षाकडून घेतली जाईल.

सत्ताधारी पक्षातीलच कुणीतरी गर्दीत घुसून गोंधळ घालतील आणि बदनाम करायचा प्रयत्न करतील, याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी. 

पक्षाने निर्णय घेतला असेल, तर आमचे कार्यकर्ते तो प्रामाणिकपणे पालन करतात असा अनुभव आहे.

आंदोलन हे कार्यकर्त्यांच्या रक्तात भिनलंय, अशा प्रकारचं हे पहिलंच आंदोलन.

आम्ही कुणाशी संपर्क साधलेला नाही, पण अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया चॅनल्सवर पाहिल्या. विद्या चव्हाण स्वतःच येऊन गेल्यात. 

कार्यकर्त्यांनी जसं जमेल तसं पोहोचावं, चालत, गाडीने, ट्रेनने.

सामान्य लोकांना, व्यापारी, कामगार वर्गाला त्रास होता कामा नये. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनाअंमलबजावणी संचालनालयबाळा नांदगावकरठाणे