नेत्याचा बर्थ डे... राज ठाकरेंच्या नकारानंतरही मनसैनिक मध्यरात्री 'शिवतिर्थ'बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 09:53 IST2022-06-14T09:47:38+5:302022-06-14T09:53:32+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय व्यासपीठ आणि चर्चांपासून दूर आहेत.

Raj Thackeray : Leader's Birthday ... Mansainik out of Shivatirtha at midnight even after Raj Thackeray | नेत्याचा बर्थ डे... राज ठाकरेंच्या नकारानंतरही मनसैनिक मध्यरात्री 'शिवतिर्थ'बाहेर

नेत्याचा बर्थ डे... राज ठाकरेंच्या नकारानंतरही मनसैनिक मध्यरात्री 'शिवतिर्थ'बाहेर

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांचा आज 14 जून रोजी वाढदिवस असतो. मात्र, यंदा ते क्वारंटाईन असल्याने आणि प्रकृतीच्या कारणास्तव कोणालाही भेटणार नाहीत. यासंदर्भात त्यांनीच दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियातून आवाहन केले होते. मात्र, आपल्या नेत्यावर प्रेम करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मध्यरात्री 12 वाजता शिवतिर्थाबाहेर जाऊन राज ठाकरेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा स्विकारण्यासाठी राज ठाकरेही गॅलरीत आल्याचं दिसून आलं.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय व्यासपीठ आणि चर्चांपासून दूर आहेत. राज ठाकरे यांच्या हिप बोनवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ते आवश्यक ती काळजी घेत आहेत. या दरम्यान, राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस आहे. या अनुषंगाने राज यांनी त्यांच्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केलं होतं. वाढदिवसानिमित्त कुणीही भेटायला येऊ नये, असे ते म्हणाले होते. मात्र, मनसैनिक मध्यरात्री त्यांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेच. 

राज ठाकरेंचा वाढदिवस आमच्यासाठी उत्सवाप्रमाणे आहे, असे म्हणत कार्यकर्ते शिवतिर्थ बंगल्याबाहेर पोहोचले. तेथे फटाके वाजवून त्यांनी आनंद साजरा केला. तर, मनसैनिकांनी एका सुरात 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणायला सुरुवात केली. अखेर राज ठाकरे काहीवेळासाठी गॅलरीत आले. त्यांनी मनसैनिकांच्या दिशेने हात उंचावत शुभेच्छांचा स्वीकार केला. नेत्याने मनाई केली असतानाही, कार्यकर्ते शुभेच्छांसाठी मध्यरात्री पोहोचल्याचे हे दृश्य वेगळचे होते. 

काय म्हणाले होते राज ठाकरे

महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या एका डेड सेल मुळे ती शस्त्रक्रिया नियोजित वेळी करता आली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी १०-१५ दिवस घरात क्वारंटाइन राहिलो आहे. आता पुढील आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र याच दरम्यान, येत्या मंगळवारी (१४ जून) माझा वाढदिवस आहे. या वाढदिवशी दरवर्षी अनेक महाराष्ट्र सैनिक मला भेटतात. त्यातून त्यांना आणि मलाही समाधान मिळतं. पण या वर्षी मात्र मला वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये, कारण मला कोणालाच भेटता येणार नाही.

मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर फाडले

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातही बॅनर्स लावून राज ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. मुंब्रा येथील नुरानी हॉटेलसमोरील रस्त्यावर हे बॅनर लावण्यात आले होते. मात्र यातील काही बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले आहे. त्यामुळे आता परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Web Title: Raj Thackeray : Leader's Birthday ... Mansainik out of Shivatirtha at midnight even after Raj Thackeray