बोट दुर्घटनेवरुन राज ठाकरे भडकले, मुख्यमंत्र्यांनी उरलेला काळ नीट ढकलावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 22:37 IST2018-10-24T22:35:12+5:302018-10-24T22:37:41+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवस्मारक पायभरणी बोट दुर्घटनेवरुन सरकारला टार्गेट केलं आहे. सरकारकडे पैसे नसताना, अशा योजना

बोट दुर्घटनेवरुन राज ठाकरे भडकले, मुख्यमंत्र्यांनी उरलेला काळ नीट ढकलावा
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवस्मारक पायभरणी बोट दुर्घटनेवरुन सरकारला टार्गेट केलं आहे. सरकारकडे पैसे नसताना, अशा योजना काढतात आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात, असे राज यांनी म्हटले आहे. केवळ मोठमोठ्या घोषणा करुन जनतेची फसवणूक सुरू आहे. सुदैवाने लोकांचे जीव वाचले हे महत्वाचं, त्यासाठी परमेश्वराचे आभारच मानायला हवेत. पण, मुख्यमंत्र्यांनी आता उरलेला काळ नीट ढकलावा, असेही राज यानी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी आता सरकारचा उरलेला काळ नीट ढकलावा. राज्यातील तिजोरीत पैसा नसताना स्मारकं कशी बांधणार ?. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधण्यासाठी राज्य गहाण ठेऊ असं सरकार सांगते. तर दुसरीकडे राज्याची आर्थिक परिस्थिती सांगणारा अहवालही आलाच आहे. सरकारकडून केवळ लोकांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत, असा आरोप राज यांनी केला. मुंबईच्या अरबी समुद्रातील शिवस्मारक पायाभरणी समारंभ कार्यक्रमावेळी स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळून बुडाली. या अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या बोटीवर 25 जण होते. यापैकी 24 जणांना वाचवण्यात यश आले असून सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.