Join us  

भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही!; राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 7:33 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राद्वारे निशाणा साधला आहे.  

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राद्वारे निशाणा साधला आहे. आज भाऊबीज, या सणाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 2014 साली देशवासीयांना खोटी आश्वासनं देऊन भाजपा सत्तेवर आली, यावर भाष्य करणारे व्यंगचित्र राज यांनी साकारले आहे. 

आजच्या व्यंगचित्रात त्यांनी भारतमाता आणि पंतप्रधान मोदींना दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओवाळणीसाठी पाटावर बसले आहेत आणि भारतमाता रुसून त्यांच्याकडे पाठ करुन उभी आहे. भारतमाता मोदींना म्हणतेय की, 'गेल्या वेळेस ओवाळले...पण आता यापुढे नाही ओवाळणार !' म्हणजे 2014मध्ये आश्वासनांची बरसात करुन भाजपा सत्तेत आली. पण आता 2019 तसं काहीही होणार नाही, असे टीकास्त्र राज ठाकरे यांनी सोडले आहे.

(अमित शहा म्हणजे नरकासूर, राज ठाकरेंची व्यंगचित्रामधून टीका)

शिवाय, या चित्रात 2014 आणि 2018ची परिस्थिती मांडण्यात आली आहे. 2014 मध्ये मोदींनी पुढील 5 वर्षात देशात 100 स्मार्टसिटी, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार, गंगा साफ करणार, शेतकऱ्यांची कर्ज माफी , शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पाकिस्तानला धडा शिकवणार, भ्रष्टाचारी काळे पैसेवाले पकडणार अशा आश्वासनांची बरसात केली होती. पण अद्यापपर्यंत या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, असे व्यंगचित्राद्वारे सांगण्यात आले आहे. 

तर 2018 पर्यंत काय काय घडलं हेदेखील चित्रात मांडण्यात आले आहे.  राफेल भ्रष्टाचार, रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर घाला, सुप्रीम कोर्टाच्या स्वायत्ततेवर घाला, वर्तमानपत्रे तसंच मीडियाची मुस्कटदाबी, निवडणूक आयोगाची गळचेपी, पेट्रोल-डिझेल 90रु.च्या वर, महिलांवरील अत्याचारात वाढ, रुपयाची ऐतिहासिक घसरण, बेरोजगाराती वाढ,  परदेशातून काळा पैसा आलाच नाही, बँकांना लुटून मल्ल्या, निरव मोदी, मेहूल चोक्सी, इत्यादी फरार, भाजपाच्या तिजोरीत प्रचंड वाढ, शेतकरी आत्महत्यात वाढ-कर्जमाफी नाही,या सर्व मुद्यांची आठवण राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना करुन दिली आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून भाजपा सरकारच्या निरनिराळ्या मुद्यांवर भाष्य करणारे व्यंगचित्र सादर केले आहे. याद्वारे त्यांनी भाजपावर बोचऱ्या शब्दांत टीका केल्याचे पाहायला मिळाले. 

('फेकलेले' आकडे पाहून लक्ष्मीही थक्क, राज ठाकरेंचा मोदी-फडणवीस-गडकरींवर वार)

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदी