Join us  

भारत ICU मध्ये; लोकसभा निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल!... राज ठाकरेंचं कार्टुन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 7:53 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर अतिशय बोचरी टीका केली आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर अतिशय बोचरी टीका केली आहे. धनत्रयोदशी निमित्तानं राज ठाकरे यांनी देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. याचित्राद्वारे त्यांनी भाजपाला चांगलेच फटकारले आहे. 

राज ठाकरे काय म्हटलंय व्यंगचित्रात?

हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव 'धन्वंतरी' ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात!,असे सांगत राज ठाकरे यांनी 'भारत' देशाला आयसीयूमध्ये दाखवले आहे. 

यावर आयसीयूबाहेर काळजीत उभे असणाऱ्या जनतेला धन्वंतरी सांगत आहेत की, काळजीचे कारण नाही! परंतु गेल्या चार-साडेचार वर्षात त्याच्यावर खूपच अत्याचार झालेत! लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर !, अशा शब्दांत त्यांनी थेट भाजपा सरकारवर बोचरी टीका केली आहे.

(इतका अवाढव्य खर्च वल्लभभाईंना तरी कसा पटेल?, राज ठाकरेंनी भाजपाला फटकारलं)

यापूर्वी त्यांनी पुतळ्यांच्या राजकारणावरुन भाजपा सरकारला चांगलेच फटकारले होतं. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपा सरकारवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधण्यात आला होता. 2389 कोटी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेल्या ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ पुतळ्याचे अनावरण 31 ऑक्टोबरला करण्यात आले.  सरदार पटेल यांच्या जयंती दिनी पंतप्रधान मोदी यांनी स्मारकाचे उद्घाटन केले.  

राज ठाकरे यांनी याआधीही पुतळ्यांना आपला विरोध असल्याचे म्हटले होते. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही त्यांनी तीव्र विरोध केला होता. पाच हजार कोटी खर्चून महाराजांचा पुतळा उभारण्यापेक्षा महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची भूमिका ठाकरे यांनी मांडली होती.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेदिवाळीभाजपा