“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:53 IST2025-08-04T15:50:07+5:302025-08-04T15:53:25+5:30
Raj Thackeray News: युती संदर्भात काय करायचे? त्याचा निर्णय मी घेईन, तुम्ही फक्त मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
Raj Thackeray News: आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विशेषत: मतदार यांद्यांवर लक्ष देण्याच्या सूचना राज यांनी केल्या आहेत. मतदार यादी तपासा, जुने कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही एकत्र काम केले पाहिजे. कार्यकर्त्यांनी वाद न घालता एकत्रित निवडणुकीची तयारी केली पाहिजे. लोकांशी संपर्क वाढवण्यावर भर द्यावा, अशा सूचना राज ठाकरेंनी केल्या.
जवळपास ३०-४० मिनिटे राज यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले. आपला पक्ष मुंबईत सर्वात जास्त बलवान आहे. विनाकारण कोणाला ही मारू नका आधी समजवून सांगा. मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर शिकवा. उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका. पण उर्मट बोलला तर मग पुढे तशी भूमिका घ्या, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले.
यंदा महापालिकेत सत्ता आपलीच येणार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा, मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा. मतदार याद्यांवर काम करा. मी आणि उद्धव ठाकरे २० वर्षानंतर एकत्र येऊ शकतो तर मग तुमच्यात हेवेदावे ठेवू नका आणि एकत्रित येऊन कामाला लागा. युती संदर्भात काय करायचे? त्याचा निर्णय मी घेईन, तुम्ही फक्त कामाला लागा. यावेळी मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार, हे टाळ्या शिकण्यासाठी मी बोलत नाही. जुन्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या, जे पक्षापासून दूर गेलेले आहेत त्यांना सुद्धा एकत्र करून तयारीला लागा, असे स्पष्ट आदेश राज ठाकरे यांनी दिले.
दरम्यान, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या सूचना हात वर करून मान्य केल्या आहेत. युतीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. आपण एकमेकांना मानसन्मान दिला पाहिजे. आपण कसं वागतो, त्यावरही लक्ष दिले पाहिजे. माजी पदाधिकारी, उमेदवार होते, काही घरी बसलेले आहेत. तुम्हाला आवडत नाही, पटत नाही मात्र तो पक्षाचा कार्यकर्ता आपला आहे. तो कार्यकर्ता आपल्यासोबत घेतला पाहिजे. त्याला विश्वास दिला पाहिजे, अशी सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.