शिवाजी पार्कवर कोणाचा फटाका तर कोणाची लवंगी

By अतुल कुलकर्णी | Updated: October 19, 2025 11:22 IST2025-10-19T11:21:41+5:302025-10-19T11:22:20+5:30

या कार्यक्रमात, दोघे मिळून एक बुके बाळाला देऊ, असे आपण म्हणालात. त्यावेळी बाळा नांदगावकर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातीत होता.

raj thackeray and uddhav thackeray together celebrate diwali whose cracker and whose cloves at shivaji park | शिवाजी पार्कवर कोणाचा फटाका तर कोणाची लवंगी

शिवाजी पार्कवर कोणाचा फटाका तर कोणाची लवंगी

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

प्रिय राज ठाकरे, जय महाराष्ट्र 

आपण सगळी कटुता विसरून आपले मोठे चुलत बंधू उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाच्या उद्घाटनाला बोलावले. सहकुटुंब सगळ्यांनी एका रांगेत उभे राहून दिव्याचे बटन दाबले. क्षणार्धात अवघा शिवाजी पार्क लाखो दिव्यांनी उजळून निघाला. आपण दोघे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातही शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या मनात असेच लाखो दिवे उजळतील का? असा प्रश्न भाजपच्या काही नेत्यांना पडला आहे. दीपोत्सवाचे उद्घाटन संपूर्ण परिवाराने एका रांगेत उभे राहून केले. फोटोग्राफरसाठी ही दिवाळीच ठरली. मात्र, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांच्या मध्ये संजय राऊत का उभे राहिले? हा प्रश्न सगळ्या फोटोग्राफरना पडला. अनेकांनी, अनेकांना निरोप देऊन त्यांना थोडे मागे जायला लावले. तेव्हा कुठे त्यांना हवा तसा फोटो काढून घेता आला. राऊत हे उद्धव यांच्या इतके जवळ गेल्याचे कालच कळाले.

या कार्यक्रमात, दोघे मिळून एक बुके बाळाला देऊ, असे आपण म्हणालात. त्यावेळी बाळा नांदगावकर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातीत होता. ते रडायचेच बाकी होते. आपण दोघांनी एकत्र यावे म्हणून ज्यांनी मनापासून प्रयत्न केले त्यात बाळा नांदगावकर शीर्षस्थानी होते. त्यांच्यासाठी कालची दिवाळी जोरात झाली. आता महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना येत्य़ा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तुम्ही दोघे मिळून एकच बुके देणार की, दोघे वेगवेगळी फुलं वाटणार? याचा खुलासाही झाला असता तर बरे झाले असते. असो. आपण सर्वपक्षीय नेत्यांना फटाके उडवण्यासाठी शिवाजी पार्कवर बोलावले. पण प्रत्येकाने वेगवेगळे हट्ट केल्यामुळे आपण तो बेत रद्द केला म्हणे..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण फटाके उडवण्यासाठी बोलावले होते. पण, ‘सध्या माझ्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक फुसक्या फटाक्यांना वाती लावून देण्याचे काम जोरात सुरू आहे. येत्या काळात असे फुसके फटाके ठिकठिकाणी पेरण्याचे नियोजन चालू आहे. शिवाय जास्त आवाज करणाऱ्या काही फटाक्यांच्या वाती पेटवण्याआधीच काढून टाकायच्या आहेत, म्हणून आपण येऊ शकत नाही...’, असे कारण त्यांनी दिल्याचे समजले. खरे-खोटे तुम्हा दोघांना माहिती... पण तुम्ही तुमच्या संपर्कातल्या काही फुसक्या फटाक्यांनाही वाती लावून द्याल का? असे त्यांना विचारले हे खरे 
आहे का...?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘मला सुतळी बॉम्बच पाहिजे. मी बॉम्ब फोडला की, त्याचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे’, असे सांगितल्याचे कळाले. तुम्ही सुतळी बॉम्ब फोडाल, पण त्यातून नुसता आवाज येईल. नंतर खूप धुरळा उडेल आणि पुढचे काहीच दिसणार नाही, असे आपण त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी, ‘मी माझे फटाके दरेगावात उडवेन’ असे म्हणत पार्कात यायला नकार दिल्याचे समजले. हे खरे आहे का?

दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘मी येईन. पण मला नको तेवढा आवाज करणाऱ्या फटाक्यांची ॲलर्जी आहे. त्यापेक्षा मी भुईनळे उडवेन. भुईनळा पेटवला की, वर जाताना तो रंग बदलतो. एकदाच दोन-चार भुईनळे लावले की, त्यांचे रंग बेमालूमपणे एकमेकांत मिसळतात. मूळ रंग कोणाचा कोणता हे देखील लवकर कळत नाही... शेवटी तो गुलाबी गुलाबी होतो... गेल्या काही वर्षांपासून आपल्याला गुलाबी रंग आवडत आहे. त्यामुळे गुलाबी रंगाच्या फुलबाज्याही आणा’, असे दादांनी सांगितले हे खरे आहे का..?

‘ही माझी शेवटची निवडणूक’ असे म्हणणारे व प्रत्येक निवडणुकीत तेवढ्याच उत्साहाने सहभागी होणारे शरद पवार यांनी दीपोत्सवाला येताना अट घातली म्हणे? ‘मी टिकल्यांना देखील फटाक्याच्या आवाजात फोडून दाखवले आहे. मला टिकली द्या नाहीतर फटाका... मी तो फोडून तर दाखवेनच. त्याचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत ऐकू येईल, अशी व्यवस्थाही करेन’, असे त्यांनी सांगितल्यामुळे गावागावातल्या टिकल्या, फुसके फटाके, आम्हाला शरद पवारांच्या हस्ते पेटण्याचे भाग्य मिळू द्या, असे आपल्याला म्हणत असल्याचे समजले. असे खरंच काही घडले का..? असे किती फटाके आपल्याकडे आले..? त्यातले काही फटाके आपण वाती लावण्यासाठी देवेंद्रजींकडे पाठवले, असे आम्हाला कळाले. त्यामुळे तुम्ही नेमके कोणासाठी, कुठे कुठे आणि काय काय करत आहात, हाही प्रश्न पडला आहे. 

राहुल गांधी यांना आपण दीपोत्सवचे निमंत्रण दिल्याचे समजले. मात्र ‘आमच्या पक्षातील नेते एकमेकांच्याच दारापुढे फटाके लावण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मी जरी तुमच्याकडे आलो तरी ते येतील की नाही, मला कळत नाही. त्यामुळे मीच येण्याचे रद्द करतो’, असे त्यांनी कळवले हे खरे आहे का..? तसेही हल्ली संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ एकमेकांच्या दारासमोर तर वर्षा गायकवाड ‘मातोश्री’समोर फटाके उडवत आहेत. काँग्रेस मुख्यालयासमोर शुकशुकाट आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास बिक्कड एकटेच टिकल्या उडवत बसल्याची माहिती आहे. काँग्रेसबद्दल खात्री देता येत नाही. त्यामुळे आपणच एकदा खात्री करून घ्यावी. त्यांचा फटाका कोणाच्या हातून कसा फुटेल, याची गॅरंटी नसते... असो. आम्हाला मात्र तुम्ही केलेल्या लाखो दिव्यांची आरास बघायला आवडते. ती बघायला आलो की तुम्हाला सांगतो. तुम्ही पाच मिनिटं तुमच्या घराबाहेर येऊन आमच्याशी गप्पा मारा... म्हणजे आम्ही पुढे जायला मोकळे... 

तुमचाच बाबूराव
 

Web Title : शिवाजी पार्क दिवाली: किसका पटाखा, किसकी फुलझड़ी? राजनीतिक दिवाली व्यंग्य।

Web Summary : राज ठाकरे ने उद्धव को दिवाली पर बुलाया। राजनीतिक नेताओं ने पटाखों की मांग की, जिससे रद्द हो गया। महाराष्ट्र के राजनीतिक दिवाली समारोहों पर व्यंग्यात्मक टिप्पणी, व्यक्तिगत प्राथमिकताओं और पार्टी की गतिशीलता को हास्य के साथ उजागर करती है।

Web Title : Shivaji Park Diwali: Whose firecracker, whose sparkler? Political Diwali satire.

Web Summary : Raj Thackeray invited Uddhav for Diwali. Political leaders made demands for firecrackers, leading to cancellation. Satirical take on Maharashtra's political Diwali celebrations, highlighting individual preferences and party dynamics with humor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.