“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:59 IST2025-10-15T12:57:17+5:302025-10-15T12:59:54+5:30
Raj Thackeray State Election Commission: ठाकरे बंधूंनी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती निवडणूक आयोगावर केली. यातील अनेक प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांना देता आली नाहीत, असे म्हटले जात आहे.

“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
Raj Thackeray State Election Commission: राज्यातील मतदार यादीत लाखो चुका आहेत, ही यादी विधानसभा निवडणुकीसाठी वापरली. आता तीच यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीतील दोष दूर करून त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी महाविकास आघाडी-सहयोगी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन केली. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी राज ठाकरे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. आता पुन्हा दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते आणि राज ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते.
आगामी स्थानिक स्वराज संस्था तसेच मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांना एका मागून एक अनेक प्रश्न विचारले. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी का करत आहेत, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. काही प्रश्नांची उत्तरे देताना आयोगाची अधिकारी निरुत्तर झाल्याचे सांगितले जात आहे.
राज ठाकरे यांनी दिले बाळासाहेब थोरात यांचे उदाहरण
बाळासाहेब थोरात गेल्या आठ टर्मपासून ८० ते ९० हजार मतांनी निवडणूक जिंकत असताना यंदा लाखाने कसे पडले? हे कसे शक्य आहे, अशी विचारणा राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केली. आमचे-तुमचे करत बसू नका. आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. जोपर्यंत राजकीय पक्षांचे एकमत होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. केवळ सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही. मतदान नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करत आहात? निवडणुका राजकीय पक्ष लढवतात, तर राजकीय पक्षांना शेवटची मतदारयादी का दाखवली जात नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.
डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका
उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना थेट प्रश्न केले. त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका घ्यायच्या कशाला, डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका. यावर अधिकारी म्हणाले की, काही जबाबदारी आमच्याकडे नाही. या उत्तरावर, मग आम्ही कोणाशी बोलू? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. दुसरीकडे, आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झालेले नाही. आता स्थानिक स्वराज्य निवडणुका होत आहेत, त्याबाबतही अनेक तक्रारी आहेत, ही बाब बाळासाहेब थोरात यांनी निदर्शनास आणून दिली. तर, जयंत पाटील यांनी काही गोष्टी पुराव्यांसह मांडल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले उपस्थित होते. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात अशी मागणी करण्यात आली.